संप काळात एसटीतून दूध, भाजीपाला नेण्यास बंदी

मुंबई, 2 जून 2017/AV News Bureau:

कर्जमाफीच्या मागणीसाठी १ जूनपासून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पाश्वभुमीवर एसटी बसेसना कोणतेही नुकसान होवू नये म्हणून एसटीतून मोठ्या प्रमाणात दूध तसेच कृषी मालाची वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.

शेतकऱ्यांचा संप चिघळत चालला आहे. त्यामुळे या अंदोलकांच्या प्रक्षोभाचा एसटी बसेस अथवा प्रवाशांना फटका बसू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एसटीतून दूध, भाजीपाला  व अन्य कृषीजन्य मालाची वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र व्यक्तीगत पातळीवर शेतकऱ्यांना आपला शेतीमाल एसटीबस मधून घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला नसल्याचे आदेश एसटीच्या सुरक्षा विभागाकडून देण्यात आले आहेत.

संप काळात आंदोलकांच्या प्रक्षोभाला कृषीमालाची वाहतूक करणारी अनेक खासगी वाहने बळी पडली आहेत. या पाश्वभुमीवर  काही व्यावसायिक एसटी बसमधून कृषीमालाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संपकऱ्यांच्या उद्रेकाचा फटका एसटी बसेस व एसटीतील प्रवाशांना बसू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.