कोकण आयुक्तपदी डॉ. जगदीश पाटील रुजू

नवी मुंबई, 7 जून 2017/AV News Bureau:

डॉ. जगदीश पाटील यांनी आज कोकण विभागीय महसूल आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. ते यापूर्वी सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते.

डॉ. पाटील यांनी यापूर्वी  सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, महिला व बालविकास, जिल्हाधिकारी सोलापूर, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, बेस्टचे महाव्यवस्थापक, अशा विविध पदांवर काम केले आहे.

डॉ.पाटील यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1991 मधील उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लातूर भूकंप पुनर्वसन, मोवाड पूर दुर्घटना यामध्ये त्यांचे काम विशेष उल्लेखनीय होते. सातारा जिल्हा हागणदारी मुक्त केल्यामुळे त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

कोकण विभागात पर्यटन आणि फलोत्पादनाच्या क्षेत्रात विशेष काम करण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले.