लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात विक्रमी यश मिळेल

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास
 अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 19 मार्च 2019:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा सरकार स्थापन झाले पाहिजे, अशी जनतेची महाराष्ट्रासह देशभर मानसिकता असून यावेळी राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह सर्व मित्रपक्षांची महायुती 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक विक्रमी यश मिळवेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत व्यक्त केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात लोकसभा निवडणुकीसाठीच्या माध्यम विभागाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, प्रदेश सचिव मनोज पांगारकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक,  प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल शाह, कांताताई नलावडे, विश्वास पाठक, श्वेता शालिनी, सुनील नेरलकर, आ. भाई गिरकर, आ. राज पुरोहित व आ. अनिल बोंडे  उपस्थित होते. केशव उपाध्ये यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या ‘भाजपा संदर्भ’ या लोकसभा – विधानसभा निवडणूक आकडेवारीच्या संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तसेच अतुल शाह यांनी तयार केलेल्या ‘सीएम चषक’ या कॉफीटेबल बुकचेही प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लाट होती त्यापेक्षा मोठी लाट या निवडणुकीत मोदीजींच्या पाठिंब्यासाठी आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्याची लोकांची मानसिकता बनली आहे. विविध पक्षांतील प्रभावी नेते भाजपामध्ये येत आहेत. मोदीजींच्या नेतृत्वाखालीच देश प्रगती करेल आणि सुरक्षित राहील, याची या नेत्यांना खात्री वाटते. भाजपा शिवसेनेचे चार संयुक्त कार्यकर्ता मेळावे झाले त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह होता. युतीमध्ये पुन्हा जुना उत्साह संचारला आहे. केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांच्याशी आपली चर्चा झाली असून ते युतीसोबतच आहेत व ते 24 मार्चच्या पहिल्या प्रचारसभेला असतील.
  • सर्जिकल स्ट्राईकविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलेल्या उलटसुलट विधानांविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानच्या सीमापार सर्जिकल स्ट्राईक झाले हे संपूर्ण जगाला माहिती आहे. पाकिस्तानवर आलेला आंतरराष्ट्रीय दबावही सर्वांनी पाहिला आहे. पण हे मान्य केले तर खंबीर नेतृत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रेय मिळेल. यामुळे शरद पवार गोंधळलेले आहेत. ते संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत. देशात लोकसभा निवडणुकीत पहिला क्रमांक भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएचाच असेल हे आता विरोधी पक्षांनीही मान्य केले असून त्यांच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा सुरू आहे.

====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा