जेएनपीटीच्या टर्मिनलवर सायबर हल्ला

नवी मुंबई, 28 जून 2017/AV News Bureau:

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या सायबर हल्ल्याचा फटका आता भारतालाही बसला आहे. देशातील सर्वात मोठे बंदर असलेल्या जेएनपीटीतील एका खासगी टर्मिनलवर सायबर हल्ला झाल्यामुळे कामकाज ठप्प पडले आहे. यामुळे या कंपनीचे जगभरातील 75 टर्मिनलचे कामकाज बंद पडले असून तातडीने उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई पोर्टट्रस्टसह देशातील इतर सरकारी टर्मिनल पूर्णपणे सुरक्षित असून सरकारतर्फे सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत असल्याची माहीती सरकारी सूत्रांनी दिली.

जेएनपीटीमध्ये कार्यरत असणाऱ्या चारपैकी एपीएम मर्सेक कंपनीच्या टर्मिनलवर मंगळवारी संध्याकाळी सायबर हल्ला झाला. या हल्ल्यामुळे टर्मिनलची यंत्रणा ठप्प पडली असून त्याचा फटका कंपनीच्या जगभरातील 75 टर्मिनलला बसला आहे. या हल्ल्यामुळे जेएनपीटीतील कंपनीच्या टर्मिनलमधून होणाऱ्या रोजच्या साडेचार हजार कंटेनरच्या हाताळणीला फटका बसला आहे. रोजच्या कामकाजावर कोणताही परिणाम होवू नये म्हणून या टर्मिनलवर येणारे कंटेनर दुसरीकडे वळविण्या येणार आहेत. तसेच सिडकोच्या द्रोणागिरी येथील कंटेनर यार्डचीही मदत घेण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गिकर यांनी दिली.

जेनपीटीतून होणाऱ्या व्यापारावर अधिक परिणाम होवू नये तसेच स्थानिकांनाही त्याचा फटका बसू नये यासाठी सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जहाज मंत्रालय आणि जेएनपीटी प्रशासन वेगाने हालचाली करीत आहेत. तसेच राष्ट्रीय सायबर सुरक्षा विभागाचे डॉ. गुलशन राय हेदेखील या संपूर्ण घटनेकडे बारकाईन लक्ष ठेवून असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

जेएनपीटी पोर्टवरील टर्मिनलवर झालेल्या सायबर हल्ल्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सुदैवाने मुंबई पोर्ट ट्रस्ट, कांडला बंदर, चेन्नई, कोचिन, विशाखापट्टणम, कोलकाता आदी ठिकाणची  बंदरे सुरक्षित असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, गुजरातमधील पिपाव पोर्टवरही अशाप्रकारचा हल्ला झाल्याचे वृत्त आहे.