भारत-इस्त्रायल दरम्यान सात करार

दहशतवादाविरोधात एकजुटीने लढणार, गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सहकार्य

जेरूसलेम, 5 जुलै 2017:

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इस्रायल दौ-यावर आहेत. आजच्या दुस-या दिवशी त्यांनी जेरूसलेम इथं इस्रायलचे राष्ट्रपती रूवन रिवलिन यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी द्विपक्षीय करारावर स्वाक्ष-या केल्या. यावेळी सात करार करण्यात आले असून त्यामध्ये गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सहकार्य आणि दहशतवादाविरोधात एकजुट याबाबतही करार करण्यात आले.

आज करण्यात आलेल्या करारांमध्ये दोन सामंजक करार जल व्यवस्थापन व तीन सहयोग करार आहेत. मोदी आणि इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषदेस संबोधित केले. त्यावेळी मोदी म्हणाले, दोन्ही देशांच्या धोरणात्मक हितांचे रक्षण करण्यासाठी भारत आणि इस्रायल एकत्रितपणे काम करण्यास तयार झाले आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना इस्रायली पंतप्रधानांनी सांगितले की, हे दोन्ही देशांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शविली आहे.

पाणी संरक्षण, पाण्याचा पुनर्वापर, सिंचन आदी क्षेत्रात इस्रायल जगात अव्वल मानला जातो. भारतासमोर असलेली पाण्याचे संकट आणि कृषी क्षेत्रातील आव्हाने यांसाठी भारतात जलसंरक्षणासाठी करार, भारतातील विविध राज्यांमध्ये पाण्याच्या नियोजनासाठी करार, कृषी क्षेत्रासाठी तीन वर्षाचा करार हे करार महत्वाचे मानले जात आहेत. तर इस्रो आणि इस्रायल अंतराळ संस्था यांमधला करारही महत्वाचा मानला जात आहे. आण्विक क्षेत्र, जीईओ-एलईओ ऑप्टिकल लिंक सहकार्य हे करारही करण्यात आले.