पालघर, ठाणे,रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 20 जुलै 2023

हवामान विभागाने आजप्रमाणे उद्याही कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालघर, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा उद्या शुक्रवारी (21 जुलै) बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे उद्याची परिस्थिती पाहून सकाळी याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी दिली.

कोकण किनारपट्टी भागात विशेषतः पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालघऱ, ठाणे तसेच रत्तागिरी जिल्ह्यातील 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळांना 21 जुलै रोजी (शुक्रवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातही पावसाचा अचानक जोर वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उद्या शाळांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण तालुक्यातील वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण आणि खेड तालुक्यातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

========================================================

========================================================