जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अलिबाग, 7 जुलै 2017/AV News Bureau:

राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करतांना जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करुन  राज्याची सांस्कृतिक संपदा जोपासणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

अलिबाग शहरात  पीएनपी  सांस्कृतिक कलाविकास मंडळ या संस्थेने सहकारी तत्वावर उभारलेल्या राज्यातील  पहिल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे कळ दाबून ॲड. नाना लिमये रंगमंचाचा पडदा उघडण्यात आला. त्यानंतर अलिबाग येथील नमन नृत्य संस्थेच्या कलावंतांनी  नांदीनृत्य सादर करुन या नाट्यगृहाचे उद्घाटन झाले.

अलिबाग येथे अत्यंत चांगले नाट्यगृह उभे राहिले आहे. सुंदर आणि सुसज्ज नाट्यगृह सहकार क्षेत्रामार्फत सुरू झाले,हे काम चांगलं आहे, म्हणुनच अशा चांगल्या कामांच्या पाठीशी सरकार उभे आहे. राज्यात कलेचे क्षेत्र रुंदावत आहे. असे असतांना विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी राज्यात चांगल्या नाट्यगृहांची आवश्यकता आहे. नाट्यकला ही राज्याची सांस्कृतिक संपदा आहे. ही संपदा जोपासण्यासाठी राज्यात नवी नाट्यगृहे उभारण्यासाठी चालना देतांनाच जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकरण करण्यासही शासनाचे प्राधान्य असेल, असे फडणवीस यांनी सांगितले. त्याच प्रमाणे सिनेरसिकांना दर्जेदार सिनेमे पाहता यावे यासाठी थिएटर उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.