सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखाची मदत

अंपगत्व आलेल्यांना एक लाखाची मदत

जखमींवरील उपचाराचा संपूर्ण खर्च शासनामार्फत

मुंबई, 26जुलै 2017/AV News Bureau:

घाटकोपर येथील सिद्धीसाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

सुनील सितप यांच्या मालकीच्या नर्सिंग होमच्या नुतनीकरणात बीम आणि कॉलमला इजा पोहोचवल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत तसेच विधानपरिषदेत सांगितले.

घाटकोपर येथे काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात विरोधी पक्षामार्फत नियम ९७ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

दुर्घटनेतील पिडीतांना सरकारतर्फे मदत

  • या घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने दोन लाख
  • अपंगत्व आलेल्यांना एक लाख रूपयांची मदत
  • जखमींवरील उपचाराचा संपूर्ण खर्चही शासनामार्फत केला जाईल.
  • स्पेशल टास्क अंतर्गत या इमारतीचा पुनर्विकास तातडीने करून संबंधितांना घरे उपलब्ध करून दिली जातील.

 

  • बचाव कार्य करणाऱ्या जवानांचे कौतुक

घाटकोपर येथील सदर दुर्घटना २५ जुलै रोजी सकाळी १०.४३ वाजता घडली. त्याची सूचना अग्निशमन विभागास १०.४६ वाजता प्राप्त होऊन १०.५३ वाजता अग्निशमन विभागाची टीम घटनास्थळी उपस्थित झाली. १४ फायर इंजिनसह ३०० कामगार आणि एनडीआरएफ चे जवान तसेच १४ रूग्णवाहिकांसह वैद्यकीय पथकाने घटनास्थळी मोलाचे कार्य करून ३१ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.