पेंटाग्राफ तुटल्यामुळे  हार्बर कोलमडली

नवी मुंबई, 26 डिसेंबर 2017/avirat vaatchal news

ऐन गर्दीच्यावेळी सकाळी हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. बेलापूर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा पेंटाग्राफ तुटला. गाडीतून धूर निघू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले या प्रकारामुळे हार्बरमार्गावरील वाशी ते पनवेल ही रेल्वे सेवा ठप्प पडली आहे.

बेलापूर-सीवूड- उरण रेल्वेमार्गाचे काम करण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला होता. तर सोमवारी पहाटे 2 ते दुपारी 3 च्या सुमारास संपूर्ण हार्बर सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र नाताळ आणि लागोपाठच्या सुट्टीमुळे तेवढा परिणाम झाला नव्हता. मात्र सुट्टीनंतरच्या पहिल्याच दिवशी नोकरदारवर्ग कामावर निघालेला असतानाच  सकाळी 10 च्या सुमारास बेलापूर स्थानक परिसरात पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या घटनेनंतर दुरूस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.  ऐन गर्दीच्यावेळी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांमध्ये  गोंधळ निर्माण झाला आहे.