सहा तासांच्या खोळंब्यानंतर हार्बर सुरळीत

रेल्वेतून उडी मारल्यामुळे एक प्रवासी जखमी

नवी मुंबई, 26 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

पेंटाग्राफ तुटल्यामुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळित झालेली हार्बर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू होण्यासाठी तब्बल सहा तासांचा अवधी लागला. दिवसभर या मार्गावरची वाहतूक विस्कळित राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेतून उडी मारल्यामुळे प्रेमानंद यादव हा प्रवासी जखमी झाला आहे.

बेलापूर स्थानकात आज सकाळी दहाच्या सुमारास पेंटाग्राफ तुटल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती. ही गाडी पनवेलच्या दिशेने जात होती. गाडीतून धूर निघू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आणि अनेकांनी गाडीमधून उड्या मारल्या.

दरम्यान, नेरूळ-पनवेल मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. या काळात नेरूळ ते सीएसएमटी अशा विशेष लोकल चालविण्यात आल्या.

बेलापूर-सीवूड- उरण रेल्वेमार्गाचे काम करण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला होता. तर सोमवारी पहाटे 2 ते दुपारी 3 च्या सुमारास संपूर्ण हार्बर सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र नाताळ आणि लागोपाठच्या सुट्टीमुळे तेवढा परिणाम झाला नव्हता. मात्र सुट्टीनंतरच्या पहिल्याच दिवशी नोकरदारवर्ग कामावर निघालेला असतानाच पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाडीचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.