…आणि बेभान आंदोलनकर्ते धावून गेले

नवी मुंबई, 4 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभरात बुधवारी बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी तोडफोड, केल्याच्या, रस्ते रोखून धरल्याच्या घटना घडल्या. मात्र ही आंदोलने सुरु असताना वाशी पुलाच्या दिशेने  आंदोलनकर्ते भीमसैनिक धावून गेले. सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. थोड्याच वेळात सगळ्यांना भिषणतेची कल्पना आली आणि आंदोलन तिथेच थांबले…

वाशी पुलावर संध्याकाळी एक भीषण अपघात घडला. पुलाच्या उतारालाच डंपर बंद पडल्याने जागीच उभ्या असलेल्या या वाहनाला पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता कि टेंम्पोचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला. त्यामुळे चालकाशेजारी बसलेली एक महिला, तिच्या दिड वर्षाच्या मुलीसह बसल्या जागीच गाडीत अडकून पडली होती. पुलाचा उताराचा भाग असल्याने पाठीमागून भरधाव वेगात येणारे इतर एखादे वाहन त्या टेम्पोला धडक देण्याची शक्यता होती. यामुळे आंदोलनाच्या तयारीत असलेले आंदोलनकर्ते मदतनीसाच्या भूमिकेत शिरले. तातडीने अपघातग्रस्त गाडीकडे धाव घेतली. त्यावेळी बंदोबस्तासाठी तेथे असलेले पोलीसही आंदोलनकर्त्यांच्या मदतीसाठी धावले. वाहतूक शाखेचे उपायुक्त नितिन पवार, सहायक आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे, वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड हे देखील त्याठिकाणी उपस्थित होते. टेम्पोत अडकलेल्यांची सुटका करणे एका दोघांचे काम नव्हते हे लक्षात आल्यानंतर सर्वच आंदोलकांनी मदतीसाठी हात पुढे करत बचावकार्याला सुरवात केली. त्यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलीसही मदतीला धावून गेले. अक्षरश: हाताने टेम्पोचे चेपलेले पत्रे ओढून त्याखाली अडकलेल्या माय लेकीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. सुमारे दहा मिनिटांच्या अविरत प्रयत्नांनंतर मायलेकींना सुखरूप बाहेर काढूनच सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला.