कोकणातील शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेवर मिळतील याची दक्षता घ्या

कृषि मंत्र्यांनी घेतला कोकण विभागीय खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे,9 मे 2023

कोकण विभागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बि-बियाणे, पिककर्ज आदी वेळेवर मिळण्यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. तसेच शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आज राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

कोकण विभागस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आज राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सहसचिव गणेश पाटील, प्रभारी विभागीय आयुक्त  डॉ. राजेंद्र भोसले, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, रत्नागिरीचे परीक्षित यादव, रायगडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, सिंधुदुर्गचे एस.आर.बर्गे, रत्नागिरीच्या शुभांगी साठे,  विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन अधिकारी संजय भावे, आत्माचे संचालक दशरथ तांभले, कृषी प्रक्रिया संचालक डॉ. कैलास मोते यांच्यासह कृषी, फलोत्पादन आदी विविध विभागाचे अधिकारी तसेच ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड या जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी अधिकारी उपस्थित होते.

सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत योजना पोचविण्यासाठी व मदत देण्यासाठी कृषि विभागाने पाऊले उचलावीत. विभागातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून खरीप हंगामाचे नियोजन करावे. खते, बि-बियाणांशिवाय शेतकऱ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाने प्रयत्न करावेत. कोकणातील जमिनीची उपलब्धता पाहून शेतीसाठीच्या पाणी साठविण्यासाठी जलकुंभासारखे नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासंदर्भात विचार व्हावा.

खरीप हंगामात खतांचा व बि-बियाणांचा पुरेसा पुरवठा होईल, याकडे लक्ष द्यावे. खतांचा गैरवापर रोखण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. कोकण विभागात आंबा, काजू, भात या पिकांसह इतर पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून पहिलीपासुन कृषि शिक्षण देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सत्तार यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही सत्तार यांनी यावेळी सांगितले.

कृषी विभागाचे प्रधान सचिव डवले म्हणाले की, खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांना प्राधान्य द्यावे. त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. नाचणी, नागली व वरई या तृणधान्याचे उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा. नॅनो युरियाच्या वापरावर भर द्यावा. सेंद्रीय शेती व कमीत कमी खत वापरणारे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक पिकांची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. हापूस आंब्यांच्या संदर्भात सध्या अनेक ठिकाणी नकारात्मक चर्चा सुरु आहे. त्यावर योग्य ती उपाययोजना करावी.

विभागीय आयुक्त भोसले म्हणाले की, कोकण विभागातील परिस्थितीनुसार खरीप हंगामाचे नियोजन करावे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन कृषि अधिकाऱ्यांनी माहिती घ्यावी व नियोजन करावे. नुकसानीची भरपाईसाठी राज्य शासन नेहमीच तत्पर आहे. शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करावा.

यावेळी पाचही जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामाचे नियोजनाची माहिती तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. विभागाचे सादरीकरण विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी केले.

यावेळी राज्यस्तरीय नाचणी पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने तयार केलेल्या भित्तीचित्रांचे प्रकाशन कृषी मंत्री सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सुधारित नाचणी बियाणे वाटपांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

खरीप हंगाम 2023 चे नियोजन

  • खरीप हंगामासाठी 4 लाख 29 हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन
  • 11 लाख 61 हजार मेट्रिक टन उत्पादनाचे लक्ष,उत्पादकतेमध्ये सरासरी 22 टक्के वाढ अपेक्षित
  • हंगामासाठी 69 हजार 587 क्विंटल बियाणांची मागणी,आजअखेर 21 हजार 500 क्विंटल भात बियाणांचा पुरवठा
  • 70 हजार 380 मेट्रिक टन खतांचे आवंटन असून आतापर्यंत 10 हजार 821 मे.टन पुरवठा
  • यावर्षी 22 हजार 540 हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात येणार
  • 1 हजार 500 शेतीशाळांचे नियोजन
  • यंदा नॅनो युरियाच्या 29 हजार 816 बाटल्या वापरण्याचे नियोजन

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र