IAS परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

 मुंबई, 3 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

संघ लोक सेवा आयोगातर्फे (युपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा- 2017 चा निकाल 10 जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. यामध्ये यशस्वी होऊन मुलाखतीसाठी पात्र झालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे नवी दिल्ली येथे मुलाखत चाचणी क्षमतावृद्धी कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुने महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, मंडी हाऊस जवळ, नवी दिल्ली -110 001 येथे मुलाखत प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून डॉ. प्रमोद कमलाकर लाखे (संपर्क 09422109168) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

प्रशिक्षणासाठी 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत  www.preiasnagpur.org.in या संकेतस्थळावर अर्ज भरुन नाव नोंदणी करावी. तसेच directoriasnag@gmail.com या ईमेलवर अर्ज पाठवावा. संपर्कासाठी मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (एसआयएसी) (दूरध्वनी क्र 022-22070942) आणि नागपूर दूरध्वनी क्र. 071-2565626 वर संपर्क साधावा, असे नागपूर येथील पूर्व आयएएस प्रशिक्षण केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.