महाराष्ट्रातल्या तीन कारागीरांना शिल्पगुरू पुरस्कार 

विविध हस्तकला प्रकारांमध्ये उत्कृष्ट कारागिरीसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 29 नोव्हेंबर 2022:

भारतीय हस्तकला तसेच  वस्त्रोद्योग क्षेत्रात महत्वाचे योगदान देणा-या देशभरातील कुशल कारागिरांना शिल्प गुरू पुरस्कार आणि 78 राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांसाठीचे 30 शिल्प गुरू पुरस्कार आणि 78 राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या तीन कारागीरांचाही समावेश आहे.

मातीची भांडी बनवणे या प्रकारात अभय ब्रह्मदेव पंडित, चामड्याची कोल्हापुरी चप्पल यासाठी अमर बाजीराव सातपुते आणि हाताने केलेल्या भरतकामातील कौशल्यासाठी रजनी अविनाश शिर्के यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

कुशल कारागिरांच्या कौशल्याला आणि भारतीय हस्तकला तसेच  वस्त्रोद्योग क्षेत्रातील त्यांच्या मौल्यवान योगदानासाठी हे  पुरस्कार दिले जातात. उत्कृष्ट कारागिरी, निर्मिती कौशल्य आणि पारंपारिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पुढील पिढीतील प्रशिक्षणार्थी कारागिरांना हस्तकलेचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले ज्ञान देण्यात त्यांनी बजावलेली भूमिका यासाठी दिग्‍गज कुशल कारागीरांना शिल्प गुरू पुरस्कार दिले जातात.

भारतातील हस्तकलेच्या पुनरुत्थानाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी वर्ष 2002 मध्ये पुरस्कार सुरू करण्यात आले. सोन्याचे नाणे, 2 लाख रुपये , ताम्रपत्र, शाल आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वर्ष 2017, 2018 आणि 2019 या वर्षांसाठी 30 शिल्प गुरूंची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये 24 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे.

विविध हस्तकला श्रेणींमध्ये उत्कृष्ट कारागिरीसाठी 1965 पासून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जात आहेत. 1 लाख रुपये, ताम्रपत्र, शाल आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 2017, 2018 आणि 2019 च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी 78 कारागिरांची निवड करण्यात आली आहे.

—————————————–