काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकत्र  बैठक

  • राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा

मुंबई, 6 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष घटकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष केंद्र व राज्यातील सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण सांगितले .काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्यातील समस्या, राजकीय परिस्थिती आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली.

या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

  • बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खा. अशोक चव्हाण म्हणाले की, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, सरकारची वाढती दडपशाही आदी मुद्द्यांवर सरकारविरोधात संयुक्तपणे लढा देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. निवडणुकीमध्ये आघाडी करण्याविषयीचा निर्णय केंद्रीय पातळीवर होईल, असे त्यांनी आघाडीसंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.