कौल बंद, आता लक्ष 23 फेब्रुवारीकडे

vote

सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 50 टक्क्यांच्या आसपास मतदान

मुंबई, 21 फेब्रुवारी 2017/AV News Bureau :

राज्यातील १० महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हापरिषदा व त्यांतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडले. ३ कोटी ७७ लाख ६० हजार ८१२ मतदारांनी  १७ हजार ३३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले . मतदानासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र तरीही अनेक ठिकाणी तणावाच्या घटना घडल्या. मुंबईत विक्रमी मतदान झाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये निकालाबाबत धाकधूक वाढली आहे. येत्या 23 फेब्रुवारी रोजी मतदारांचा फेवरेट कोण हे जाहीर होईल.

  • राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान

voting chart

 

  • शरद पवारांचे मत कोणाला ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत मतदान केले. मात्र पवार यांनी कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवारासमोरील बटन दाबले याचीच चर्चा दिवसभर रंगली.

शरद पवार आज सकाळी आपल्या नातीसह मतदानासाठी घराबाहेर पडले होते. शरद पवार यांचे नाव प्रभाग क्रमांक 214 मध्ये नाव आहे. मात्र त्या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा नव्हता. त्यामुळे पवार जेवहा मतदान करण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी नेमके कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. याबाबत कुजबूज सुरू झाली.

  • मुंबईत मतदारांची नावे गायब

सगळ्यांचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत आता वेगळाच वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहे. सकाळी मतदानासाठी मतदान केंद्रावर जाणाऱ्या अनेक नागरिकांना त्यांची नावेच मतदार यादीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विधानसभेसाठी मतदान केले परंतु आता महापालिका निवडणुकीत मतदार यादीतून नावच गायब झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मानखूर्द, कफ परेड, दादर, सायन,कुर्ला आदी भागांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकाची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. त्याचा परिणाम मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले आहे.