राष्ट्रीय सुरक्षेला सायबर हल्ल्यांचा धोका

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली भीती

अविरत वाटचाल न्यूज

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2018 :

सध्याच्या सायबर युगात राष्ट्रीय सुरक्षेला सायबर हल्ल्यांचा धोका असल्याची भीती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व्यक्त केली आहे. पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या 48 व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या धोक्याचा सामना तंत्रज्ञानाच्या मदतीने करायला हवा,  अशी सूचनाही नायडू यांनी केली. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यास‍ह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हॅकिंगच्या माध्यमातून शत्रू शेकडो किलोमीटर दूरवरून देशाच्या सुरक्षेव्यवस्थेवर हल्ला करू शकतो. तंत्रज्ञानाच्या या धोक्याचा सामना करताना पोलिसांनीही नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करून त्यानुसार आपले धोरण आखण्याची गरज आहे, असे नायडू यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा विषयात पोलिसांचे ज्ञान आणि कार्यक्षमता त्यांच्यात संशोधन आणि अत्याधुनिक सुधारित उपकरणांच्या वापरावर अवलंबून आहे, त्यादृष्टीने या विभागाचे कार्य महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. आपल्याला ‘समृद्ध भारता’आधी ‘सुरक्षित भारता’ची गरज आहे. भारत सुरक्षित असला तरच तो सक्षम बनू शकेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

सायबर हल्ले रोखण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकत्रित काम करायला हवे. त्यांच्यात समन्वय असला तरच सुरक्षा व्यवस्था प्रभावीपणे राबवता येईल. पोलीस दलाला सायबर हल्ल्यांसारख्या आव्हानांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्रांनी एकत्र येऊन यंत्रणा तयार करावी. देशातल्या सर्व पोलीस स्थानकांमध्ये सायबर फॉरेन्सिक तंत्रज्ञान विकसित केले जावे, अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.