कर्जमाफीसाठी अधिवेशनच योग्य वेळ

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, 14 मार्च 2017/AV News Bureau:

शेतकरी कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्ष अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.

यासंदर्भात उद्या विधानभवनात  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार असून यावेळी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अधिक आक्रमक रणनिती स्विकारण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे सर्व दावे आणि तथाकथित उपाययोजना फोल ठरल्या आहेत. मागील अडीच वर्षात आत्महत्यांचे सत्र कमी करण्यात आलेले अपयश, हाच सरकारच्या फसलेल्या योजनांचा पुरावा आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी हा एकमेव प्रभावी आणि तातडीचा पर्याय शिल्लक राहिल्याचे विखे पाटील यांनी  म्हटले आहे.

मागील अडीच वर्षात महाराष्ट्रात सुमारे नऊ हजार शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्येचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे कर्जमाफीची घोषणा करण्यात सरकारने अधिक वेळकाढूपणा करु नये. मुख्यमंत्री मागील एक वर्षापासून योग्य वेळी कर्जमाफी करण्याचे आश्वासन देत आहेत. परंतु त्यांच्या योग्य वेळेचा मुहूर्त अद्याप उजाडलेला नसल्याने रोज अनेक हतबल शेतकरी आत्महत्या करित आहेत. कर्जमाफी करण्यासंदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापेक्षा दुसरी कोणतीही अधिक योग्य वेळ असू शकत नाही. सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास याच अधिवेशनात कर्जमाफीसाठी आर्थिक तरतूद करणे शक्य होऊ शकेल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.