पालघरमध्ये विमान निर्मिती प्रकल्पास सहकार्य करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 3एप्रिल 2017/AV News Bureau:

राज्यात पालघर येथे विमाननिर्मिती प्रकल्पासाठी राज्य शासन सर्व मदत करणार आहे. यासाठी राज्य शासन कॅप्टन अमोल यादव यांच्या कंपनीबरोबर सहकार्य करण्यास तयार आहे. या प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी केंद्र शासनाच्या नागरी विमान महासंचालनालयाकडे राज्य शासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

कॅप्टन अमोल यादव हे ट्रस्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून पालघर येथे विमान निर्मिती प्रकल्प उभारणार आहेत. या प्रकल्पाचे आज मुख्यमंत्र्यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यात 19 आसनी नागरी वाहतूक विमान निर्मिती करण्याचा यादव यांचा प्रकल्प आहे. यामुळे अंतर्गत विमान वाहतूक सुलभ होणार आहे. तसेच हा प्रकल्प राज्य शासनाच्या औद्योगिक विकास महामंडळाबरोबर संयुक्त भागीदारीतून करण्यात यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

प्रायोगिक तत्त्वावर तयार केलेले विमानाच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आता 19 आसनी विमान बनविण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने जमीन व इतर बाबींसाठी मदत करावी. लहान आकाराच्या विमानामुळे राज्यातील 30 विमानतळांदरम्यान वाहतूक सुरू करता येईल. यासाठी सध्या असलेल्या कुठल्याही विमानतळावर अतिरिक्त पायाभूत सुविधांची गरज भासणार नाही, असे यादव यांनी विमान निर्मितीची प्रक्रिया व या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले.