खाजगी रूग्णालयातील कोव्हीड उपचारांविषयी बिलांच्या तक्रार निवारणासाठी विशेष केंद्र स्थापन

नागरिक सुविधेसाठी

हेल्पलाईन क्र. 022-27567389 आणि

व्हॉट्स ॲप क्र. 7208490010 जाहीर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ७ सप्टेंबर २०२०

कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असताना कोरोना बाधितांना त्यांच्या लक्षणांनुसार योग्य प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये बेड्स उपलब्धतेबाबत अडचणी येऊ नयेत याकरिता रिअल टाईम अपडेटेड डॅशबोर्ड  www.nmmchealthfacilities.com कार्यान्वित करण्यात आलेला आहे.

  • काही खाजगी रूग्णालये शासनाने जाहीर केलेल्या दरांपेक्षा जास्त दर आकारात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून प्राप्त होत असल्याने नागरिकांना सुलभपणे विनासायास आपली तक्रार नोंदविता यावी व त्यावर विहित वेळेत योग्य कार्यवाही व्हावी याकडे आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी कोव्हीड रूग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांकडून आकारण्यात आलेल्या बिलांच्या तक्रारी संदर्भातील मदतीसाठी “कोव्हीड १९ बिल तक्रार निवारण केंद्र (Covid Bill Complaint Centre)” कार्यान्वित करण्यात येत आहे. याकरिता 022-27567389 हा दूरध्वनी क्रमांक तसेच 7208490010 हा व्हॉट्स ॲप क्रमांक नागरिकांच्या सुलभ संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

काही रूग्णालयांकडून या आदेशाचे व शासन निर्णयाचे उल्लंघन होऊन रूग्णांच्या देयकात जास्तीचे दर आकारून बिले दिली जात असल्याच्या तक्रारी रूग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांचेकडून महानगरपालिकेस प्राप्त होत आहेत. त्याचे निराकरण तत्परतेने करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीत तळमजल्यावर ७ सप्टेंबर २०२० पासून सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ‘कोव्हीड बिल तक्रार निवारण केंद्र (Covid Bill Complaint Center)’ सुरू करण्यात येत आहे.

या विशेष केंद्राकरिता 022-27567389 या हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात येत असून कोव्हीड रूग्ण अथवा त्यांचे नातेवाईक कोव्हीड बिलांविषयीच्या तक्रारीसाठी त्यावर संपर्क साधू शकतील. या केंद्रातील कर्मचारी संपर्क साधणा-या व्यक्तीकडून रूग्णाचे नाव, तक्रारदाराचे नाव, मोबाईल व संपर्कध्वनी क्रमांक, रूग्णाचा पूर्ण पत्ता, रूग्णालयाचे नाव व पत्ता, रूग्णालयात दाखल दिनांक, रूग्णालयातून डिस्चार्ज दिनांक, रूग्णालयाने आकारलेल्या बिलाची रक्कम व तक्रारीची संक्षिप्त माहिती विचारतील. त्यानंतर तक्रारदार व्यक्तीस cbcc@nmmconline.com या ई मेल आय डी वर अथवा 7208490010 या व्हॉट्स अॅप क्रमांकावर बिलाच्या प्रती पाठविणेबाबत सूचित केले जाईल. या प्रती प्राप्त झाल्यानंतर तक्रारदारास विशिष्ट टोकन क्रमांक दिला जाईल.

बिलांविषयी प्राप्त झालेल्या तक्रारींवर महानगरपालिकेच्या वतीने २४ तासांत योग्य ती कार्यवाही केली जाईल व सदर कक्षाकडून तक्रारदाराला तक्रारीविषयी करण्यात आलेल्या कार्यवाहीविषयी माहिती देण्यात येईल. याशिवाय तक्रारदार आपल्या टोकन क्रमांकाचा संदर्भ देऊन आपल्या तक्रारीविषयी करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती या केंद्राकडून उपलब्ध करून घेऊ शकेल.

================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा