नवी मुंबईत रेल्वे स्थानकांवर कोरोना चाचणी केंद्रे सुरु

जोखमीच्या कोविड प्रसारकांची प्राधान्याने तपासणी करण्याचे आयुक्तांचे निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 23 नोव्हेंबर 2020:

कोविड 19 ची दुसरी लाट येण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. यानुसार जलद रुग्ण शोधण्यासाठी दररोज 4 हजाराहून अधिक चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी ए.पी.एम.सी. मार्केट व एम.आय.डी.सी. क्षेत्र यादृष्टीने जोखमीच्या भागांप्रमाणे आजपासून बेलापूर, नेरुळ, आणि वाशी या तीन रेल्वे स्थानकावरही कोरोना चाचणी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. व्यक्तीची लक्षणे पाहून टेस्टींग करण्यात येत असून प्रामुख्याने आर.टी – पी.सी.आर. टेस्टवर भर देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी 400 हून अधिक नागरिकांचे ॲण्टिजन / आर.टी – पी.सी.आर. टेस्ट करण्यात आले आहेत.

रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात येणा-या स्टेशनवरील निर्गमनाच्या जागांवर महानगरपालिकेची आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून सकाळी 8 ते 1 या वेळेत ही आरोग्य पथके नागरिकांचे कोविड 19 टेस्टींग करणार आहेत. एका आरोग्य तपासणी पथकामध्ये 6 जणांचा समावेश आहे.  उर्वरित रेल्वे स्टेशनवरही आरोग्य पथके कार्यान्वित करून कोव्हीड 19 टेस्टींग केले जाणार आहे.

त्याचप्रमाणे शाळा सुरु करण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने शिक्षकांचे टेस्टींग सुरु करण्यात आले होते. त्यामध्ये 1195 शिक्षकांच्या आर.टी – पी.सी.आर. टेस्ट करण्यात आल्या असून त्यामधील 17 शिक्षकांच्या टेस्टचे निदान पॉझिटिव्ह आलेले आहे. तथापी आता शाळा 31 डिसेंबर नंतर सुरु होणार असल्याने त्यावेळी पुन्हा टेस्ट केल्या जाणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील नागरिकांना अन्न, धान्य पुरवठा करणारे तुर्भे येथील ए.पी.एम.सी. मार्केट हे अतिशय महत्वाचे व्यापार केंद्र असल्याने याठिकाणी व्यापारी, शेतकरी, विक्रेते, ग्राहक, कामगार यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे अत्यंत जोखमीचे क्षेत्र असणा-या ए.पी.एम.सी. मार्केटकडे सुरुवातीपासूनच विशेष लक्ष देण्यात येत असून कोविडच्या दुस-या लाटेच्या अनुषंगाने कांदा बटाटा मार्केट येथील स्थायी सेंटरप्रमाणे मसाला, दाणा बाजार, फळ, भाजीपाला अशा एकूण पाचही मार्केटमध्ये असलेली टेस्टींग सेंटर्स अधिक प्रभावीपणे कार्यन्वित करण्यात आली आहेत.

तसेच एम.आय.डी.सी. क्षेत्रातही आसपासच्या परिसरातून हजारो कर्मचारी कामगार ये-जा करीत असल्याने एम.आय.डी.सी. मधील कंपन्यांमध्येही टेस्टींग करण्यात येत आहे.

कोविड 19 च्या दुस-या लाटेच्या अनुषंगाने रुग्ण शोधावर भर देण्यासाठी ज्या व्यक्तींचा लोकसंपर्क आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक व्यक्तीशी असतो अशा फेरीवाले, किराणा दुकानदार, किरकोळ विक्रेते, फळे व भाजी विक्रेते, रिक्षा चालक अशाप्रकाच्या जोखमीच्या कोवीड प्रसारकांची प्राधान्याने तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधितांना दिलेले आहेत. त्याबाबतची कार्यवाही देखील सुरु करण्यात येत आहे.