अग्निवीरांच्या महत्वाकांक्षेला कॉंग्रेसचा राजकीय खोडा

भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचा आरोप

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 1 जुलै 2022

केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील राष्ट्रप्रेमी तरुणांना केवळ रोजगाराच्या नव्हे, तर देशसेवेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या थेट भरती योजनेस मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कॉंग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनीच या योजनेची प्रशंसा करून स्वपक्षाचे कान उपटल्याने कॉंग्रेसच्या स्वार्थी राजकीय हेतूचा मुखवटा उघड झाला,असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केला.

अग्निपथ ही लष्कराच्या व्यापक आधुनिकीकरणाची क्रांतिकारी योजना आहे, अशा शब्दात या योजनेची प्रशंसा कॉंग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी एका लेखात केल्याने कॉंग्रेसची पंचाईत झाली आहे. दुसरीकडे या योजनेतून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेस तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून पंचेचाळीस हजार पदांच्या भरतीसाठी सहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केल्याने देशातील तरुणाईने या योजनेचा स्वीकार केल्याने कॉंग्रेसचा तिळपापड झाला आहे, अशी टीका  रामचंद्र घरत यांनी केली. या योजनेस विरोध करून कॉंग्रेसने देशाची संरक्षण व्यवस्था खिळखिळी करण्याच्या फुटीरतावाद्यांच्या कारस्थानालाच अप्रत्यक्षपणे ताकद दिली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

देशांतर्गत दहशतवाद, नक्षलवादी कारवाया आणि परकी शक्तींनी पुकारलेले छुपे युद्ध अशा अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी तरुणांना सिद्ध करणाऱ्या या योजनेस विरोध करण्याकरिता कॉंग्र्ससारख्या राजकीय विरोधकांनी देशात तरुणांची माथी भडकावण्याचे काम सुरू केले आहे. केवळ मोदी सरकारच्या एका महत्वाकांक्षी योजनेस अपशकुन करण्यासाठी राजकीय विरोधक बेरोजगारीच्या समस्येचे भांडवल करून निष्पाप तरुणांची माथी भडकावत आहेत. अग्निपथ योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणामुळे अर्थव्यवस्थेत नव्याने निर्माण होत असलेल्या उद्योजकता आणि नोकऱ्यांच्या अनेक संधींचा पाठपुरावा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे चिथावणीच्या कारस्थानास युवकांनी बळी पडू नये, असे आवाहन रामचंद्र घरत यांनी केले.

============================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप