9 मार्च रोजी नवी मुंबईतला पाणीपुरवठा बंद

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 8 मार्च 2021:

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील 100/22KV सब स्टेशनच्या देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रावरील पाणीपुरवठा उद्या 9 मार्च रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांत मंगळवार 09 मार्च 2021 रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही.

या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणी पुरवठा देखील बंद राहील, तसेच बुधवार 10 मार्च 2021 रोजी कमी वेळ व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.