कोरोना अपडेट्स: नवी मुंबईत 45 बसेस रूग्णवाहिकेत रूपांतरित

नवी मुंबईतील सर्व नागरी आरोग्य केंद्रांच्या रूग्णवाहिकांमध्ये वाढ

  • अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
  • नवी मुंबई, १० एप्रिल २०२१ 

कोरोनाबाधितांची दैनंदिन वाढत असलेली संख्या लक्षात घेता कोरोना बाधितांना नागरी आरोग्य केंद्रातून कोविड केंद्रावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये व कमीत कमी कालावधीत त्यांना कोव्हीड केंद्रामध्ये दाखल होण्यासाठी जाता यावे याकरिता महानगरपालिकेच्या 45 रूग्णवाहिकेत रूपांतरित केलेल्या एनएमएमटी बसेस कोरोनाबाधितांना नागरी आरोग्य केंद्रातून कोव्हीड केंद्रात ये-जा करण्यासाठी कार्यरत करण्यात आल्या आहेत. तसेच त्यामध्ये आणकी वाढ करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जसजसे रूग्ण नागरी आरोग्य केंद्रात येतील तसतसे त्यांना टप्प्याटप्प्याने कोव्हीड केंद्रात दाखल होण्यासाठी पाठविणे शक्य होणार आहे. याव्दारे कोरोनाबाधितांचा प्रवासातील वेळ कमी होणार असून कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्याची प्रक्रियाही अधिक जलद करण्याचे निर्देश आयुक्तांनी सर्व कोव्हीड केंद्रांच्या नोडल अधिका-यांना दिलेले आहेत.

कोव्हीड रूग्णांकरिता महानगरपालिकेमार्फत 26 अद्ययावत रूग्णवाहिकांसह आता 45 बसेस स्वरूपातील रूग्णवाहिका सुसज्ज असून यमाध्ये तातडीने वाढ करण्यात येत आहे व याव्दारे कोव्हीड रूग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे.

कोरोना रुग्णांसाठी बेड्स आणि रुग्णवाहिकेसाठी हेल्पलाइन क्रमांक

बेड्सप्रमाणेच रूग्णवाहिका उपलब्धतेमध्येही नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये याकरिता 022-27567460 हा 24 X 7 दिवसरात्र कार्यरत असणारा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिकांनी या सुविधेचा वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.