नवी मुंबईत 26 थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस

नोटिशीला उत्तर न दिल्यास जप्तीची कारवाई करणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 16 जून 2021:

मोठ्या रक्कमेची थकबाकी असणा-या 26 थकबाकीदारांना मालमत्ता कर विभागाने मालमत्ता जप्ती / लिलाव यांची नोटीस बजावलेली आहे. नोटिशीला विहित कालावधीत उत्तर देण्यात आले नाही तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्तीची कार्यवाही करावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आज दिले. मालमत्ता कर विभागाच्या आज झालेल्या बैठकीत कर विभागाच्या प्रमुख प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करून व त्यास मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न देणा-या थकबाकीदार मालमत्ताधारकांना जाणीव व्हावी याकरिता नोटीस बजाविण्याचे आदेश मालमत्ता कर विभागाच्या 28 मे रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त बांगर यांनी दिले होते. त्यानुसार मालमत्ता कर विभागाने मोठ्या रक्कमेची थकबाकी असणा-या 26 थकबाकीदारांना मालमत्ता जप्ती / लिलाव यांची नोटीस बजावलेली आहे.

महानगरपालिकेच्या वतीने अभय योजना जाहीर करून आवश्यक मुदत व थकबाकीवर सवलत देऊनही थकबाकीदार मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष करत असतील तर कायदेशीर कारवाई करावी लागेल ही भूमिका आयुक्तांनी स्पष्ट केली.

साधारणत: ऑगस्ट महिन्यात  कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून कोविड सुविधा उभारण्याकरिता लागणारा खर्च लक्षात घेता तसेच कोविडप्रभावी काळात आरोग्यासह इतरही विभागातील कर्मचारी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे कामात व्यस्त होत असल्याने 31 जुलै पर्यंत मालमत्ता कराची जास्तीत जास्त वसूली व्हावी व त्यातही मोठ्या रक्कमेच्या थकबाकीदारांकडून वसूलीसाठी झपाटून कामाला लागण्याचे निर्देश आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाताली अधिकारी, कर्मचा-यांना दिले.

मालमत्ता कर विभागासाठी स्वतंत्र लीगल सेल

ब-याच मालमत्तांबाबत कोर्ट केसेस दाखल केल्या जातात व त्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. यामुळे मालमत्ताकर वसूलीवरही परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रत्येक केसेसचा नियमित आढावा घेऊन त्या निकालात काढण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. याकरिता मालमत्ता कर विभागासाठी स्वतंत्र लीगल सेल स्थापन करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले.

त्याचप्रमाणे मालमत्ता जप्ती / लिलाव याबाबतची कार्यवाही महत्वाची असून त्याबाबतची रेकॉर्ड तपासणी व प्रक्रिया विहित कालावधीत व योग्य प्रकारे व्हावी याकरिता मालमत्ता कर विभागात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याची तातडीने कार्यवाही करावी अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

काही मालमत्तांच्या बाबत दुबार नोंद झाल्याचे निदर्शनास येत असून याकरिता मालमत्ता कर विभागाच्या अंतर्गत समिती स्थापन करून धोरण निश्चित करावे असे आयुक्तांनी सूचित केले.
——————————————————————————————————