एक्सप्रेसच्या इंजिनाचे चाक घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प, दुरुस्तीनंतर वाहतूक पुन्हा सुरू

प्रतिकात्मक फोटो

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 26 जून 2021

कोकण रेल्वे मार्गावर उक्शी आणि भोके स्थानकांदरम्यान रत्नागिरी इथल्या करबुडे बोगद्याजवळ बोल्डर कोसळल्यामुळे गाडी क्रमांक 02414 हजरत निजामुद्दी – मडगाव जं. राजधानी  सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेसच्या इंजिनाचे पुढचे चाक घसरले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक जवळपास सहा तास बंद राहिली होती. अखेर सव्वा दहाच्या सुमारास वाहतूक सुरळित करण्यात रेेल्वे प्रशासनाला यश आले.

आज पहाटे 4.15 च्या सुमारास करबुडे बोगद्याजवळ बोल्डर रेल्वेमार्गावर कोसळला. त्याच सुमारास दिल्लीहून मडगावला जाणारी गाडी क्रमांक 02414 हजरत निजामुद्दी – मडगाव जं. राजधानी  सुपरफास्ट  स्पेशल तेथून जात असताना इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरले. या अपघातामुळे रेल्वेची सेवा ठप्प पडल्यामुळे अनेक गाड्या जागोजागी उभ्या होत्या.

Other Video On Youtube

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले.  रेल्वे मार्गावरून  अपघातग्रस्त इंजिन बाजूला  करून सकाळी 8.18 च्या सुमारास रेल्वे मार्ग सुरक्षित असल्याचं प्रमाणपत्र रेल्वे सुरक्षा विभागाकडून देण्यात आलं. त्यानंतर 9.14 मिनिटांनी अपघातग्रस्त एक्सप्रेस निजामुद्दीन – मडगाव या मार्गावरून पुढील प्रवासाला रवाना करण्यात आली. सकाळी 10.27  ला या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली.

=======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप