भाजपची सावध खेळी

ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना

  • सिध्दार्थ हरळकर/अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 5 मे 2024

ठाणे लोकसभा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी सोडून भाजपने स्मार्ट खेळी केली आहे. कल्याणसह ठाणे लोकसभेवरील हक्का सोडून आपण मित्र पक्षांना सन्मानाने वागवतो तसेच सतत घराणेशाहीला आता थारा मिळणार नाही, असा ठळक संदेश देत महायुतीचा धर्म पाळा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसाठी दिलेला उमेदवार निवडून आणा असेच जणूकाही ठणकावून सांगितले आहे.

भाजपच्या या खेळीमुळे पक्षांतर्गत तसेच मित्र पक्षांमध्ये असलेल्या नाराजीचा फुगा फोडत ठाणे जिल्ह्यावर भक्कमपणे नियंत्रण ठेवू शकेल असा हक्काचा माणूस हवा होता. एकनाथ शिंदेंबाबत भाजप नेतृत्वाला सध्या भरवसा वाटत असावा, असे सध्यातरी दिसते.

शिंदे गटाला उमेदवारी का ?

ठाणे जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यामध्ये बेलापूरः मंदा म्हात्रे-भाजप, ऐरोलीः गणेश नाईक-भाजप, ठाणेः संजय केळकर-भाजप, पाच पाखाडीः एकनाथ शिंदे (शिवसेना), ओवळा माजिवाडाः प्रताप सरनाईक – शिवसेना, मीरा भाईंदर: गीता जैन –भाजप यांचा समावेश आहे.

ठाण्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमधील ४ मतदार संघ हे भाजपच्या ताब्यात आहेत. तर २ मतदार संघ एकनाथ शिंदें यांच्या शिवसेनेकडे आहेत. मात्र असे असले तरी सगळ्या मतदार संघांवर म्हणजेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर प्रभाव पाडू शकेल असा नेता सध्यातरी भाजपकडे नाही. त्यामुळे मतदार संघ अधिक ताब्यात असूनही मुख्यमंत्री पद असणाऱ्या एकनाथ शिंदेंना ठाणे लोकसभा मतदार संघ देण्याबाबत भाजपच्या केंद्र तसेच राज्यातील नेत्यांनी शांतपणे विचार केला असणार हे नक्की.

भाजप नेतृत्व घराणेशाहीविरोधात असल्याचे नेहमीच सांगते. सातत्याने एकच उमेदवार दिल्यास कार्यकर्ते तसेच मतदारांना नाविण्याचा अभाव जाणवतो. भाजपने संजीव नाईक यांना उमेदवारी दिल्यास नवी मुंबईत आणि नवी मुंबईबाहेर भाजपच्या उमेदवाराला कितीसा प्रतिसाद मिळे, याबाबत नक्कीच विचार केला असणार.त्यामुळे संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याऐवजी एकनाथ शिंदे गटाला जागा देत काहीशी सुरक्षित पावले टाकण्याचे धोरण भाजपने स्वीकारल्याचे दिसते.

उद्धव ठाकरेंशी फारकत घेऊन शिवसेना ताब्यात घेतल्यानंतरची एकनाथ शिंदेंची ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे. त्यामुळे शिवसेना ताब्यात घेतल्यानंतर शिवसैनिक आणि शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांचा त्यांना कसा  कौल मिळतो,यावर एकनाथ शिंदेंची राजकीय वाटचाल अवलंबून असणार आहे. समजा उद्या लोकसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या विरोधात जर निकाल गेला तर भाजपच्या अधिक जवळ जाण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे सध्यातरी ठोस असा पर्यंत दिसत नाही. तसेच ठाणे काबीज केले तरी राज्यभरातील डोलारा एकट्याने सांभाळण्याची मोठी कसरत करावी लागेल आणि ते त्रासाचे ठरू शकेल. आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते नक्कीच वेगळी असणार. अशावेळी कितीही बळकटी आली तरी एकट्याने विरोधकांशी लढण्यापेक्षा समुहात राहून आपले अस्तित्व टिकवण्यावर महायुतीमधील सर्व पक्ष अधिक जोर देतील,असे वाटते. त्यामुळे निकाल काहीही लागो भाजपच्या सहाय्याने आपली राजकीय वाटचाल मजबूत करणे शिंदेंसाठी आवश्यक ठरते. तर एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यावर नियंत्रण ठेवणे भाजपलाही काहीसे सोपे जाईल.

शिंदेंची मजबूत पकड

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर या जिल्ह्यातील महानगरपालिकांवर प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आपली पकड मजबूत करीत आर्थिक नियंत्रण आपल्याकडे ठेवले आहे. शिंदेंचा महापालिकांवरील वरचष्मा भाजपसह इतर मित्र पक्षांसाठी काहीशा डोकेदुखी ठरणारा असला तरी सध्या त्याकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याकडे भाजपचा कल राहील. शिवाय पुढील विधानसबा निवडणुका होईपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय घेण्यापेक्षा परिस्थितीनुरुप पावले टाकण्यावर भाजपचा भर राहील, असेच काहीसे चित्र दिसते.

मनसे फॅक्टर फायदेशीर

ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबतीला भाजपसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राज ठाकरे यांची मनसे शिवाय इतरही मित्र पक्ष असणार आहेत. शिंदे यांचीही मदार आपल्या निष्ठावंतांसह भाजप, मनसे आदी मित्रपक्षांवरही असणार आहे. भाजपसाठी ४०० पार हे उद्दीष्ठ असल्यामुळे ते नक्कीच मदत करतील, अशी आशा आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढत्या मैत्रीचाही उमेदवार नरेश म्हस्के यांना फायदा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मनसेलाही विधानसभेआधी आपली ताकत आजमवण्याची संधी मिळणार आहे.

भावना महत्वाची ठरणार का ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मूळ पक्ष फोडून त्या पक्षांवर आपला हक्का सांगितला आहे. त्याचा परिणाम पक्षाचे मूळ नेतृत्व आणि पक्षाला मानणारे निष्ठावंत दुखावले गेल्याचे बोलले जाते. त्यामध्ये बऱ्याच अंशी तथ्य असले तरी जसजसा काळ पुढे सरकतो, तसतशी दुःखाची तीव्रताही कमी होत जाते. जखमा भरू लागतात आणि रागाची धारही बोथट होते. त्यानंतर भानावर आलेले मन भावनेऐवजी वास्तवतेचा अधिक विचार करून त्यादिशेने झुकण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आपले हित कशात आहे, समाज विकासाची कामे होत आहेत का,याचा विचार नक्कीच केला जाईल.

सध्या महागाई, बेरोजगारी आदी सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत केंद्रातील आणि राज्यातील सरकारांकडे बोट दाखवले जाईल. त्यामुळे या समस्यांवर जो मात करील, जो तोडगा काढील, तो लोकांची सहानुभूती मिळवेल. त्यामुळे कुणी पक्ष फोडला, कुणासोबत कोण गेला हे मुद्दे मग लक्षात राहीले तरी कालांतराने गौण व्हायला लागतात. मात्र असे असले तरी गोळा बेरजेचे राजकारण करताना मग  मतदारांच्या भावनांनाच हात घालून मते खेचण्याचे प्रयत्न होताना नक्कीच दिसतील. त्यामुळे पक्ष फोडल्याचा आरोप होणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय भवितव्य काय असणार याचीच चर्चा सर्वाधिक रंगलेली दिसून येते आणि या चर्चेच्या गुऱ्हाळात भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काहीसा विसर पडल्याचे दिसून येते. ही बाब भाजपच्या पथ्यावर पडणारी असून शिंदे आणि पवार यांच्या वाट्याला जनता काय वाढणार याकडेच लोकांचे अधिक लक्ष लागलेले आहे. त्यानुसार भाजप आपली पुढील रणनिती ठरवील असे मानायला हरकत नाही.

========================================================


========================================================