एसटीच्या 1 हजार डिझेल गाड्यांचे सीएनजीमध्ये करणार रुपांतर,140 कोटींची तरतूद

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 13 ऑक्टोबर 2021

कोरोनामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाल्याने त्याचा उत्पन्नाला फटका बसला आहे. त्यातच डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या 17 हजार बसेस असून डिझेलवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या 34 टक्के इतका होता. वाढत्या डिझेल किमतीमुळे तो आता 38 ते 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोझा पडत असल्यामुळे महामंडळ दिवसेंदिवस आर्थिक गर्तेत अडकले जात आहे. त्यामुळे एसटीच्या ताफ्यातील डिझेलवर चालणाऱ्या तब्बल 1 हजार गाड्यांचे रुपांतर सीएनजीमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गाडयांच्या रिट्रोफिटमेंटसाठी एकूण 140 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री  तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.

सीएनजी या पर्यायी इंधनावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये रुपांतर करण्यासाठी आवश्यक निधीसाठी महामंडळाने उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. रिट्रोफिटमेंटसाठी एकूण 140 कोटी रूपयांची मागणी महामंडळाने केली होती. महामंडळाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन 2021-2022 च्या अंदाज पत्रकात या निधीची तरतूद केली आहे, असे परब यांनी सांगितले. त्यानुसार डिझेलवर धावणाऱ्या एसटी बसेसचे सीएनजी वाहनांमध्ये रूपांतर करण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत.

एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजी बरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी अशा पर्यावरणपुरक इंधनावर धावणाऱ्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपुरक प्रवासाला एसटी प्राधान्य देणार आहे, असे परब यांनी सांगितले.

======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप