नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याचा होणार जागर- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, २४ सप्टेंबर २०२२

महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी व त्यांच्यामध्ये आरोग्याबद्दल जागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाने २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत  ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे विशेष अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा शुभारंभ येत्या २६ सप्टेंबर रोजी केला जाणार आहे. या अभियानात १८ वर्षावरील महिला, माता यांच्या आरोग्य तपासण्या केल्या जातील. संबंधित यंत्रणानी या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.

 

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाच्या पूर्व नियोजनासाठी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती बैठक झाली. त्यात त्यांनी अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात सूचना केल्या.

  • ग्रामीण भागात होणार महिलांची आरोग्य तपासणी

हे विशेष अभियान २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत  ग्रामीण भागातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर व मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामीण व नागरी रुग्णालये, सर्व ग्रामीण व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ज्या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत, अशा सर्व ग्रामीण व नागरी आरोग्य वर्धनी केंद्रात राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश १८ वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करणे, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे असा आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

मोहिम कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून दररोज वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दररोज सकाळी १० ते दुपारी २वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी सत्रांचे आयोजन  करण्यात येणार आहे.