मुंबईतल्या आठ वॉर्डमध्ये गोवरचे रूग्ण

मुलांचे लसीकरण वाढवण्याचे आणि स्वतंत्र ओपीडी सुरू करण्याची सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची सूचना

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 16 नोव्हेंबर 2022:

मुंबई शहरातील आठ वॉर्ड मध्ये मुलांना गोवरची लक्षणे असून या संबंधित आठ वॉर्ड मध्ये विशेष पथकांच्याव्दारे सर्वेक्षण करा. यासाठी आवश्यक असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाचे मनुष्यबळ पुरवले जाईल. मुंबई बरोबरच गोवरची लक्षणे आढळलेल्या मालेगाव आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिका परिसरातही सर्व्हेक्षण करावे. तेथेही लसीकरण वाढवावे. मुलांचे लसीकरण करण्यासाठी पालकांचे समुपदेशन करा. समुपदेशन करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात यावी असे आदेश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी मुंबई महानगरपालिका अधिका-यांना दिल्या.

सावंत यांनी मुंबई महापालिकामार्फत शहरातील काही भागात राबविण्यात येणाऱ्या गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव संजय खंदारे, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक आणि आयुक्त डॉ. तुकाराम मुंढे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ञ डॉ. राहुल शिंपी, राज्य साथरोग अधिकारी डॉ प्रदीप आवटे आदी उपस्थित होते.

मुलांचे लसीकरण वाढवा, मुलांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करावी आणि सर्व्हेक्षण करुन संशयित लक्षणे असणा-या मुलांवर लक्ष ठेवा, अशा सूचना आरोग्य मंत्री सावंत यांनी दिल्या.

गोवरचे रुग्ण झोपडपट्टीतील असल्याने या भागात जनजागृती केली जात आहे. गोवरचे सर्वाधिक रुग्ण गोवंडीत आढळलेत. तिथल्या रुग्णांना कस्तुरबा रुग्णालय लांब पडत असल्याने गोवंडीतल्या शताब्दी रुग्णालयात १० बेड्सची व्यवस्था करण्यात आलीय.

डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की मुंबई शहरातील आठ वॉर्ड मध्ये मुलांना गोवरची लक्षणं आहेत. या भागात पथकांमार्फत मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. लक्षणे आढळल्यास मुलांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुमारे दहा हजार मुलांना लसीकरण केले आहे. येत्या काही दिवसांत सुमारे पन्नास हजारांहून अधिक मुलांना लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे.

——————————————————————————————————