100  रूपयांमध्ये अडीच तास चालवा सायकल

नेरूळमध्ये “जन सायकल सहभाग प्रणाली” चे उद्घाटन

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 1 नोव्हेंबर 2018:

नवी मुंबई शहराला वाहतूककोंडी आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने जनसायकल सहभाग प्रणालीचा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध केला आहे. गुरूवारी 1 नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या उपस्थितीत महापौर जयवंत सुतार यांच्याहस्ते या जनसायकलचे उद्घाटन करण्यात आले. नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे हा पहिला सायकल ट्रॅक उभारण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरुळ स्टेशन, वंडर्स पार्क, डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, सेक्टर 6 पेट्रोल पंप, ग्रँड सेंट्रल मॉल सिवूड आणि महापालिका मुख्यालय अशा सात ठिकाणी सायकल पॉईंट्स ठेवण्यात आले असून यामध्ये टप्याटप्याने वाढ करण्यात येणार आहेत.

निवासयोग्य शहरात नवी मुंबईला देशात व्दितीय क्रमांक लाभलेला असून हे मानांकन उंचावण्याच्या दृष्टीने अधिक अत्याधुनिक व पर्यावरणाला साजेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे महानगरपालिकेमार्फत विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी नवी मुंबईकर नागरिकांच्या आरोग्यासाठी हितावह व इंधन बचतीच्या तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची अशी सायकल सेवा अल्प दरात उपलब्ध करून देत नागरिकांना दिवाळीची भेट दिली जात असल्याचे सांगितले. 

याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्यासह ऐरोली विधानसभा सदस्य आ. संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ रामास्वामी एन.,सभागृह नेते रविंद्र इथापे, अ प्रभाग समिती अध्यक्ष विशाल डोळस, ब प्रभाग समिती अध्यक्ष कविता आगोंडे, क प्रभाग समिती अध्यक्ष शशिकांत राऊत, फ प्रभाग समितीच्या अध्यक्ष अनिता मानवतकर, उद्यान समिती सभापती मीरा पाटील, स्वच्छता मिशन तदर्थ समिती सभापती नेत्रा शिर्के, नगरसेविका स्वप्ना गावडे, विनोद म्हात्रे, प्रकाश मोरे, उषा भोईर, गिरीश म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त. रविंद्र पाटील व रमेश चव्हाण, माजी शहर अभियंता मोहन डगांवकर व शहर अभियंता सुरेंद्र पाटील, परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त सुधाकर पठारे, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, तुषार पवार, नितीन काळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आधुनिक शहरात आधुनिक कल्पना राबविण्याकरीता महानगरपालिका नेहमीच अग्रेसर असून आज संपूर्ण जगभरात सायकलींगचे महत्व वाढत असल्याचे दिसत असून त्यादृष्टीने नवी मुंबईतही नागरिक स्वास्थ्यासाठी व पर्यावरणशील आणि वाहतुकीलाही सोयीचे ठरेल असे सायकल सारखे प्रदुषणमुक्त वाहन नागरिकांनी वापरावे यासाठी जन सायकल सहभाग प्रणालीच्या माध्यमातून पुढाकार घेतला जात असल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यात सात ठिकाणी सायकल पॉईंट्सची व्यवस्था असली तरी नागरिक प्रतिसाद बघुन लवकरच संपूर्ण महापालिका क्षेत्रात पॉईट्सची संख्या वाढविण्यात येणार असून 100 लोकांमागे 1 सायकल अशी संकल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युलू या संस्थेमार्फत ही सायकल प्रणाली राबविण्यात येत असून अशा प्रकारची प्रणाली राबविणा-या इतरही संस्थांचे भविष्यात स्वागत आहे असे स्पष्ट करीत आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नवी मुंबईकर नागरिक सुजाण असल्याने या उपलब्ध सायकलींचा काळजीपूर्वक वापर करतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी व नवी मुंबईच्या पर्यावरण संरक्षणासाठी जास्तीत जास्त प्रमाणात इंधनाच्या वाहनाऐवजी इंधन विरहित सायकलींचा वापर करावा असे आवाहन केले व यामधून नवी मुंबई सायकल सिटी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

ही सायकल प्रणाली राबविणा-या युलू बाईक्स प्रा. लि., बंगलोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत गुप्ता यांनी बंगलोर प्रमाणेच पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कलकत्ता, दिल्ली अशा प्रमुख शहरांत ही प्रणाली राबविली जात असल्याची माहिती देत नवी मुंबई या आधुनिक शहरातील नागरिक आवडीने दैनंदिन जीवनात सायकलींगचा वापर करतील असे सांगितले.

जन सायकल सहभाग प्रणाली (Public Bicycle Sharing System)

  •  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा पर्यावरणशील शहर म्हणून विकास होण्याच्या दृष्टीने वाहतुक समस्येला पर्याय म्हणून कमी अंतरासाठी खाजगी वाहनांचा वापर कमी व्हावा व सायकल सारखे प्रदूषणमुक्त वाहन वापराला प्राधान्य देणारी प्रणाली.
  •  पहिल्या टप्प्यात सात ठिकाणी सायकल मिळण्याचे व सोडण्याचे पॉईट्स – ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरुळ स्टेशन, वंडर्स पार्क, डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, सेक्टर 6 पेट्रोल पंप, ग्रँड सेंट्रल मॉल सिवूड आणि महापालिका मुख्यालय.
  •  टप्प्याटप्प्याने संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वर्दळीच्या ठिकाणी सायकल पॉईंट्सचे नियोजन. 
  • युलू बाईक्स प्रा. लि. या संस्थेमार्फत प्रणालीची कार्यवाही.
  • आकर्षक निळ्या रंगात, मजबूत व स्त्री – पुरुषांना वापरण्यास सुलभ सायकल उपलब्ध.
  • सायकलीच्या वापरासाठी yulu हे मोबाईल ॲप आपल्या स्मार्ट फोनवर डाऊनलो़ड करून घेणे आवश्यक.
  • सायकलवरील बारकोड मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेल्या ॲपमध्ये स्कॅन केल्यानंतर सायकलचे लॉक उघडण्याची सुविधा
  • ॲपमध्ये सायकल स्टेशन असलेली नजीकची सर्व ठिकाणे दिसतील
  •  नागरिकांनी आपले जाण्याचे ठिकाण निवडून तेथील सायकल स्टेशनवर ही सायकल सोडावी व ॲपव्दारे एन्ड करून पुन्हा लॉक करावी.
  • प्रत्येक राईड 30 मिनीटांची असेल.
  • पहिल्या राईडसाठी 30 मिनिटांकरिता रू. 1/- इतका नाममात्र दर असेल.
  • ॲपमध्ये रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट रू.100/- भरणा करावे लागेल. त्यामध्ये 5 राईड्स विनामूल्य मिळतील.
  • ॲपमध्ये पेटीएम, फोन पे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याव्दारे रक्कम भरणा करता येईल.
  • रिटेल राईड्स – 30 मिनीटांच्या राईडसाठी रू. 10/- इतकी नाममात्र रक्कम आकारण्यात येईल.
  • राईड पॅकेजेस – युलू 30 : रू. 200/- मध्ये 30 राईड्स
  • युलू 60 : रू. 300/- मध्ये 60 राईड्स

======================================================================================================================================

इतर बातम्यांचाही आढावा

विरूध्द दिशेने वाहन चालवल्यास कारवाई