सायन्स पार्कच्या कामाची आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून पाहणी

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सध्याचे नवीन व अत्याधुनिक प्रकल्पांचा समावेश करण्याची सूचना

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  •  नवी मुंबई,  18 नोव्हेंबर 2022:

नेरूळ इथल्या वंडर्स पार्क परिसरात उभारण्यात येत असलेल्या सायन्स पार्क प्रकल्पाच्या कामाची महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पाहणी केली. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल लक्षात घेऊन त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्याचे नवीन व अत्याधुनिक असलेले प्रकल्प या पार्कमध्ये लोकांना बघता येतील  याकडे विशेष लक्ष दिले जावे. इतर पार्कमध्ये बघता येत नाहीत अशाप्रकारचे नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पांचा समावेश या पार्कमध्ये करण्यात यावा अशा सूचना आयुक्तांनी यावेळी अभियांत्रिकी विभागाला दिल्या.

सायन्स पार्कमध्ये समाविष्ट करण्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही नाविन्यपूर्ण आणि इतरांपेक्षा वेगळी असेल याची दक्षता घेतली जावी. त्यासोबतच सायन्स पार्कमध्ये प्रदर्शित करावयाच्या विविध बाबींची उपलब्धता कशा पध्दतीने करता येईल याबाबतची कार्यवाही आत्ताच सुरु करावी असेही निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी दिले.

सद्या सायन्स पार्कमधील तळमजल्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून पहिल्या मजल्याचे काम सुरु आहे. हे काम वेळेत पूर्ण होईल या प्रकारे नियोजन करावे व त्याकरिता आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढ करून कामाला गती द्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.

  • सायन्स पार्कची वैशिष्ट
  • वंडर्स पार्कमधील 19500 चौ.मी. च्या बांधकाम क्षेत्रात सायन्स पार्क सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारला जात असून यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत मॉडेल्स, थ्री डी इमेजेस, प्रकल्प, ऑडियो व्हिज्युअल फिल्म्स अशा विविध माध्यमांतून विज्ञानाचे महत्व सहज साध्या पध्दतीने प्रसारित केले जाणार आहे.

मोठ्यांप्रमाणेच विशेषत्वाने लहान मुलांच्या दृष्टीने हा विज्ञान पार्क माहिती व ज्ञानाचा खजिना खुला करून देणारा असेल. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर शाळांच्या सहली येतील हे लक्षात घेऊन शाळांच्या बसेसची पुरेशी पार्किंग व्यवस्था ठेवावी व आवश्यकतेनुसार त्यात वाढ करावी असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

सायन्स पार्क पाहण्यासाठी केवळ आपल्या आसपासच्या परिसरातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून, देशाच्या विविध प्रांतातून, एवढेच नव्हे तर अगदी परदेशातूनही पर्यटक एक आकर्षण केंद्र म्हणून या पार्कला भेटी देणार असल्याचे लक्षात घेऊन या सभोवतालचा परिसरही तशा दर्जाचा ठेवावा व त्यादृष्टीने शेजारच्या वंडर्स पार्कमध्येही आवश्यक सुधारणा कराव्यात असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

नवी मुंबई हे स्वच्छ व सुंदर शहराचा सातत्याने बहुमान मिळविणारे शहर असल्याने नवी मुंबईतील प्रत्येक गोष्टीकडे ती उत्तमच दर्जाची असावी या अपेक्षेने संपूर्ण देशातील नागरिक बघत असतात. त्यामुळे वंडर्स पार्कच्या परिसरातील हा सायन्स पार्क आंतरराष्ट्रीय दर्जाचा होण्यासाठी सर्वोतोपरी काळजी घ्यावी व सायन्स पार्कमध्ये समाविष्ट प्रत्येक गोष्ट ही नाविन्यपूर्ण आणि इतरांपेक्षा वेगळी असेल याची दक्षता घ्यावी असेही या पाहणी दौ-याप्रसंगी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नमूद केले.

—————————————————–