‘फोनी’ चक्रीवादळ ओदिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

आंध्र प्रदेश किनारपट्टी, पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई,1 मे 2019:

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ ‘फोनी’ वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला सरकत असून येत्या 12 तासात हे वादळ आणखी उत्तर-पश्चिम दिशेला सरकून शुक्रवारी गोपाळपूर आणि चंदबलीदरम्यान ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. वादळाचा वेग ताशी 175 ते 185 किलोमीटरदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

2 ते 4 मे दरम्यान उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी तसेच ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर समुद्र अतिशय खवळलेला राहणार असल्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्यात आला असून मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्यांना किनारपट्टीवर परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या चक्रीवादळामुळे श्रीकाकुलम, विशाखापट्टणम आणि विजयानगरम जिल्हयांमध्ये उद्या (2 मे) तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. याच भागात 3 मे रोजीही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.

ओदिशा- दक्षिण ओदिशा किनारपट्टीवर उद्या (2 मे) तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता. तटीय ओदिशा आणि ओदिशाच्या अंतर्गत भागात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल- पश्चिम बंगालच्या किनारी तसेच अंतर्गत भागात 3 मे रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे.

 अरुणाचल प्रदेश आणि आसाम-मेघालयात 4 आणि 5 मे रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.