सफाईमित्रांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 30 नोव्हेंबर  2022:

नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ (swachh survekshan 2023 ) अंतर्गत सफाईमित्रांना (फ्रंट वर्कर) आपत्तीविषयक विविध बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहात नुकत्याच एका प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर स्वच्छतेत यावर्षी देशात तृतीय क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबई शहर नावाजले गेले आहे. या मानांकनात सर्वात महत्वाचे योगदान स्वच्छताकर्मीचे असून ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे आपले ध्येय साध्य करण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ (swachh survekshan 2023 ) ला सामोरे जाताना आणखी जोमाने काम करूया असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी केले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त मंगला माळवे, वैद्यकिय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड, अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव, अग्निशमन केंद्र अधिकारी अरुण भोईर व व्हि.डी कोळी आणि इतर अधिकारी,  कर्मचारी उपस्थित होते.

ध्वनीचित्रफितीव्दारे जनजागृती आणि विविध योजनांबाबत मार्गदर्शन

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार या  प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आपत्ती धोके प्रतिबंध विषयावर म्हणजेच आग, भूकंप, रासायनिक आपत्ती बाबात ध्वनीचित्रफितीव्दारे जनजागृती करण्यात आली.  दैनंदिन जीवनात येणा-या विविध आपत्तींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन तसेच  मुले  शिक्षणापासून वंचित राहू नयेत यादृष्टीने ऑनलाईन आरटीई प्रवेश प्रणालीबाबतचे मार्गदर्शन, मातृत्व शिशू जननी सुरक्षा योजनेबाबत मार्गदर्शन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी बेलापूर विभागातील 17 व नेरूळ विभागातील 13  अशा 30 गटांना प्रशिक्षण देण्यात आले. अग्निशमन प्रतिबंधक करावयाच्या उपाययोजना त्याचप्रमाणे वैद्यकिय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बारघरे यांनी राईट टू एज्युकेशन या विषयाची माहिती दिली व उपस्थितांशी संवाद साधत त्यांचे शंकानिरसन केले. अधिक्षक रवी जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी अग्निशमन अधिकारी यांनी अग्निशमन विषयक प्रात्यक्षिकेही दाखविली.

—————————