माजी आमदार डॉ. कांता नलावडे यांच्या “भरारी” कवितासंग्रहाचे प्रकाशन

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, वामन केंद्रे, डॉ.शिरीष देशपांडे यांची उपस्थिती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 30 नोव्हेंबर 2022:

भाजपच्या विविध राष्ट्रीय पदांवर आणि नंतर आमदार असताना आपल्या भाषणातून, आपल्या कार्यातून लोकांमध्ये ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. कांता नलावडे या येणाऱ्या काळात साहित्य क्षेत्रातही ‘भरारी’ घेतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

माजी आमदार डॉ. कांता नलावडे यांच्या “भरारी” कवितासंग्रहाचे प्रकाशन  नुकतेच रवींद्र नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे, ज्येष्ठ लेखक डॉ.शिरीष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

अनेकदा कथासंग्रह, कादंबरी यांना अनेक प्रकाशन संस्था मिळतात. काव्यसंग्रह प्रकाशित करण्यास ग्रंथाली प्रकाशन संस्थेने नफा तोट्याचा विचार न करता काव्यसंग्रह प्रकाशित केला, याचे कौतुक वाटते. मला विश्वास वाटतो की, डॉ. कांता  नलावडे यांचे  25 वे पुस्तकही प्रकाशन करण्याचे भाग्यही मलाच मिळेल, मला आनंद वाटतो की, कांताताई यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा सहवास मिळाला आणि त्यामुळे त्यांची कवितांची ओळख अधिक गडद झाली, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

या प्रसंगी बोलताना डॉ. कांता नलावडे म्हणाल्या “भरारी काव्यसंग्रह वाचकांच्या हाती देताना मनात थोडी हुरहूर, भावनांचा कल्लोळ आहे. आयुष्यात मिळालेल्या अनुभवांचं गाठोडं तुमच्याकडे सुपूर्द करताना जग हे विविधतेने कसे नटलेले आहे, दुःखितांची मने पारखताना, सुवर्णमध्ये दाखवताना, निसर्गाच्याही भावछटा मला ज्या भावल्या, बोलल्या त्या सादर केल्या आहेत. खरंतर हा एक छोटासा प्रयत्न आहे. राजकारणाच्या धावपळीत, प्रवासातल्या पळापळीत जे टिपले, जे भावले, उमगले ते कागदावर उतरवण्याचा छंद जोपासला आहे.” या प्रसंगी त्यांनी दोन कवितांचे वाचन केले.

पद्मश्री वामन केंद्रे म्हणाले की, नेता आणि अभिनेता जमिनीशी बांधलेला हवा, तसेच लेखक आणि कवी यांना संवेदनशील मन हवे, तरच आपण चांगले लिहू शकतो. डॉ. कांता राजकारणात असताना त्यांनी व्हॉईस कल्चर केले, कारण त्यांना आवाजावर पकड हवी होती. अभ्यासक्रम शिकत असताना त्या उत्कृष्ट विद्यार्थिनी होत्या. चांगले बोलण्यासाठी आधी ऐकायला शिकले पाहिजे हा दिलेला मंत्र त्यांनी पाळला. कला, साहित्य, संगीत, सिनेमा, नाटक ही माध्यमे आपल्यात कला रुजविण्याचे काम करते; आणि ही माध्यमे मन गुंतवून ठेवत असल्याने आपण मानसिकदृष्ट्या सुदृढ राहतो.

प्रसिद्ध पटकथाकार आणि साहित्यिक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यावेळी म्हणाले की, डॉ. कांता नलावडे या माझी विद्यार्थिनी म्हणून मला तिच्या ‘भरारी’चे कौतुक वाटते. आमदार म्हणून काम करताना जसे तिने विविध प्रश्न मार्गी लावण्यात पुढाकार घेतला तसे कवयित्री म्हणून तिने आपल्या लेखणीतून समाजातील परिस्थितीवर लिहिले आहे.

डॉ कांता यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी खास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी जोशी यांनी केले तर कार्यक्रमाची मांडणी व संयोजन अनिता पाध्ये यांनी पाहिले. ग्रंथाली प्रकाशनतर्फे लतिका भानुशाली यांनी प्रास्ताविक केले.

——————————————-