अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी “ग्लोबल आडगाव” ची निवड

न्युजर्सी मराठी अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई,3 जानेवारी 2023

सिल्वर ओक फिल्म्स व इंटरटेनमेंट प्रस्तुत, मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित आणि अनिलकुमार साळवे लिखित व दिग्दर्शित “ग्लोबल आडगाव” या मराठी चित्रपटाची निवड अमेरिकेतील न्युजर्सी मराठी अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे.

ग्लोबल आडगाव हा मराठीतील एकमेव चित्रपटाची सकारात्मक दखल जगभर घेतली जात आहे. हा चित्रपट कोलकत्ता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशविदेशातील नामांकित लोकांनी पाहिला आणि त्याला उदंड प्रतिसाद दिला. हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग बसू, कांतारा चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक निरीक्षित देव तर परीक्षक साजीयन कडोनी यांनी चित्रपटाची बांधणी, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय तंत्रशुद्ध बांधणी आणि दिग्दर्शनाचे प्रचंड कौतुक केले. अमेरिकीत होणाऱ्या न्युजर्सी अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मराठी) येथे ग्लोबल आडगाव हा मराठी चित्रपट दाखविला जाणार आहे. या वेळी हॉलीवूड, बॉलीवूड मधील नामांकित दिग्दर्शक आपली हजेरी लावणार आहे.

मराठी संगीत, संस्कृती आणि उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसारित व्हावेत या उद्देशाने हा महोत्सव घेतला जातो. नवीन वर्षात जानेवारी महिन्या दरम्यान बिग सिनेमा, 1655 ओक थ्री रोड एडिसन, न्यु जर्सी 08820, युनायटेड स्टेट येथे होणार आहे.

अनिलकुमार साळवे यांनी यापूर्वी शिरमी व 15 ऑगस्ट या लघुपटाचे लेखन दिग्दर्शन केले होते. त्यांना नाट्यक्षेत्रातीत लेखनाबद्दल अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन रा.रा. दातार पुरस्कार मिळाला आहे. तर 15  ऑगस्ट लघुपटास लंडन येथील न्यूलीन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलचा  बेस्ट डिरेक्टर व बेस्ट फिल्म अवार्ड मिळाला आहे. 15 ऑगस्ट या लघुपटास भारतातील  सर्वांत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके, प्रभातचा व्ही शांताराम बेस्ट फिल्म डिरेक्टर अवार्ड. केरळ, दिल्ली, राजस्थान, बंगलोर यासह राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय 91 पुरस्कार आहेत. लघुपटाच्या उदंड यशानंतर सिल्वर ओक फिल्म्स अँड इंटरटेनमेंट प्रस्तुत तर राष्ट्रीय उद्योजकतेचा पुरस्कार प्राप्त निर्माते मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित “ग्लोबल आडगाव” हा पूर्ण लांबीचा चित्रपट केला आहे. “ग्लोबल आडगाव” चित्रपटाचे दोन प्रिव्हू पुणे व मुंबईत झाले, समिक्षकांनी भरभरुन तारीफ केली.

या चित्रपटात शेती मातीत राबणाऱ्या हातांचा समृद्ध संघर्ष आहे. उत्कंठावर्धक कथासूत्र, उपहासात्मक, मर्मभेदी संवाद, ग्रामीण माणसांच्या सजीव करणाऱ्या व्यक्तीरेखा, गावजीवनाचं भव्य उदात्त चित्रीकरण या चित्रपटात केले आहे. मराठवाड्यातील अस्सल भाषा म्हणी नैसर्गिक विनोद याने खुलणारे प्रसंग व आदर्श शिंदे, गणेश चंदनशिवे व जसराज जोशी यांनी गायलेल्या व विनायक पवार, प्रशांत मंडपुवार, अनिलकुमार साळवे यांनी लिहीलेल्या गाण्यांना समिक्षाकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. “ग्लोबल आडगाव” म्हणजे शेती मातीतल्या पिठ्यांची जीवधरणी घुसमट आहे. बेरकी व्यवस्थेच्या भिंतीना तडा देणारा क्रांतीचा संघर्ष म्हणजेच ग्लोबल आडगाव आहे.

या चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर, उपेन्द्र लिमये, रोनक लांडगे, अशोक कालगुडे, सिद्धी काळे, महेंद्र खिल्लारे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, साहेबराव पाटील, शिवकांता सुतार, विष्णु भारती, ऋषिकेश आव्हाड, परमेश्वर कोकाटे, अभिजीत मोरे,  विष्णु चौधरी, रामनाथ कातोरे, विक्रम त्रिभुवन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

========================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र