ऐतिहासिक मुंबादेवी परिसराचे नूतनीकरण होणार

विकास आराखडा तयार करण्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे आदेश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 12 जुलै  2023:

दक्षिण मुंबईतील मुंबादेवी मंदिर आणि परिसर हा एक ऐतिहासिक आणि अनेक दृष्टीने महत्वपूर्ण असा विभाग असून त्याचे नुतनीकरण आणि पुनर्विकास करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने ब्रृहदआराखडा तातडीने तयार करावा. त्यासाठी या विभागातील मुंबादेवी मंदिर ट्रस्ट, श्री मुंबादेवी दागिना बाजार असोसिएशन,  इंडिया बुलीयन ॲड ज्वेलर्स असोसिएशन,  कामनाथ मंदिर ट्रस्ट आणि अन्य छोट्या-मोठ्या व्यापारी आस्थापनांना विश्वासात घेतले जावे. विद्यमान विकास आराखड्यात बदल करणे आवश्यक वाटल्यास तसे बदल देखील करण्यात यावेत,  अशा स्पष्ट सूचना विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिल्या आहेत.

विधानसभा अध्यक्ष्यांच्या दालनात मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. यावेळी ५ एकर पेक्षा मोठा परिसर असलेल्या मुंबादेवी मंदिर परिसरात धार्मिक आणि सांस्कृतीक महत्व लक्षात घेता अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे,  मंदिराची स्वच्छता आणि सुशोभीकरण यांना प्रधान्य देणे, रस्त्याचे रुंदीकरण, वाहतूक कोंडी टाळणे, फार मोठ्या आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेला ३०० वर्षांपासूनचा सोने आणि सराफा बाजार याला आकर्षक नवीन स्वरुप देणे इत्यादी बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत प्रस्तावित नूतनीकरण संदर्भात सादरीकरण करण्यात आले. बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, सी-वार्ड चे उध्दव चंदनशीवे, माजी नगरसेवक जनक संघवी, अभियंता मनिष पडवळ, वास्तुविशारद अविनाश वर्मा, मुंबादेवी ट्रस्टचे चंद्रकांत संघवी,.राजीव चोकसी, हेमंत जाधव, दागिने व्यापारी पृथ्वीराज कोठारी, ॲड.सुरज अय्यर, ॲड.संदिप केकाणे,  विक्रम जैन,.केतन कोठारी आदि उपस्थित होते.



========================================================