रस्ते सुरक्षेसाठी 57 कोटी खर्च करणार

परिवहन मंत्री दिवाकर रावते

मुंबई, 16 जून 2017/AV News Bureau:

राज्यात सुमारे 57 कोटी रुपये इतका रस्ते सुरक्षा निधी जमा झाला आहे. रस्ते सुरक्षिततेच्या उपाययोजानांसाठीच हा निधी तातडीने खर्च करायचा आहे. रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे, अतिवेगवान वाहनांवर कारवाई करण्यासाठी कॅमेऱ्यांची खरेदी करणे अशा प्रयोजनासाठी हा निधी वापरता येणार आहे. त्यामुळे याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करुन हा निधी रस्ते सुरक्षिततेसाठी खर्च करावा, असे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज परिवहन आयुक्तांना दिले. सिद्धीविनायक मंदीरासमोर भुयारी मार्ग उभारण्याबाबतही रावते यांनी यावेळी निर्देश दिले.

रावते यांच्या उपस्थितीत आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची पाचवी बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, अपर पोलीस महासंचालक आर. के. पद्मनाभन, प्रभारी परिवहन आयुक्त रणजितसिंह देओल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, मुंबई वाहतूक पोलीस शाखेचे सहआयुक्त अमितेशकुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यात रस्ते सुरक्षिततेमध्ये वाढ करुन 2020 पर्यंत रस्ते अपघातांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दीष्ट आहे. यासाठी राज्य रस्ते सुरक्षा परिषद स्थापन करण्यात आली असून संबंधीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,अशी सूचना रावते यांनी केली.

  • सिद्धीविनायक मंदीरासमोर भुयारी मार्ग

मुंबईमध्ये ज्या ठिकाणी नागरिकांकडून रस्ता ओलांडण्याचे प्रमाण अधिक आहे, अशा  जास्त वर्दळीच्या ठिकाणी चर्चगेट तसेच सीएसटीच्या धर्तीवर भुयारी मार्ग तयार करावेत. सिद्धीविनायक मंदीरासमोर अशा भुयारी मार्गाची मोठी गरज आहे. मुंबईतील अशी वर्दळीची ठिकाणी निश्चित करुन तिथे भुयारी मार्गांची निर्मिती व्हावी, असे रावते यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर हा विषय प्राधान्यावर घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.

  • ब्लॅक स्पॉटची दुरुस्ती करावी

राज्यात ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखली जाणारी अतीअपघातांची ठिकाणे सुनिश्चित करुन त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ओव्हरस्पिडींगमुळे सर्वाधिक अपघात होतात असे विविध सर्वेक्षणांमधून पुढे आले आहे. हे रोखण्यासाठी महामार्गांवर ठिकठिकाणी कॅमेरे बसविण्यासारख्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच अवजड वाहनांसाठी वाहन चालकांची वयोमर्यादा निश्चित करण्यासंदर्भातही बेठकीत चर्चा झाली.