डॉ.थंबन मेलोथ यांची राष्ट्रीय ध्रुवीय आणि सागर संशोधन केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती

 

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

गोवा, 19 ऑक्‍टोबर 2022

 केंद्र सरकारच्या भू-विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था असलेल्या एनसीपीओआर अर्थात राष्ट्रीय ध्रुवीय आणि सागर संशोधन केंद्राच्या (National Centre for Polar and Ocean Research)  संचालकपदी डॉ.थंबन मेलोथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ.मेलोथ वर्ष 2002 पासून विविध भूमिकांच्या माध्यमातून या संस्थेशी जोडले गेले आहेत. या नियुक्तीपूर्वी ते राष्ट्रीय  सागरविज्ञान  संस्थेमध्ये संशोधक आणि वैज्ञानिक या नात्याने कार्यरत होते. हवामानाची परिवर्तनशीलता आणि त्याचा ध्रुवीय प्रदेशांतील हिमशिखरांवर होणारा परिणाम या विषयावर त्यांचे सध्याचे संशोधन सुरु आहे. वर्ष 2005  मध्ये भारताची सर्वात पहिली, अत्याधुनिक आईस कोअर प्रयोगशाळा उभारण्यात डॉ.मेलोथ  यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.त्यांनी अंटार्क्टिका, आर्क्टिक,हिमालय आणि दक्षिणी समुद्र भागामध्ये अनेक वैज्ञानिक मोहिमा राबविल्या. वर्ष 2010 मध्ये दक्षिण ध्रुवावरील पहिल्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेचा भाग म्हणून अंटार्क्टिक खंडातील 2300किलोमीटर लांबीच्या बर्फाचा भाग ओलांडण्याच्या अत्यंत आव्हानात्मक अशा मोहिमेसाठी नियुक्त केलेल्या विशिष्ट पथकामध्ये त्यांचा समावेश होता.

एनसीपीओआरबाबत(National Centre for Polar and Ocean Research) माहिती

एनसीपीओआर ही गोव्यात वास्को-द-गामा जवळ स्थित प्रमुख संशोधन संस्था असून, अंटार्क्टिका, आर्क्टिक,हिमालय आणि दक्षिणी समुद्र भागामध्ये ही संस्था आव्हानात्मक ध्रुवीय मोहिमा आणि शास्त्रीय संशोधन करण्याचे कार्य करते. तसेच या संस्थेकडे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या खोल सागरी अभियान या धोरणात्मकरित्या महत्त्वाच्या महाप्रकल्पाचे काम देखील सोपविण्यात आले आहे.