हे यश म्हणजे नोटबंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब’

मुंबई,29 नोव्हेंबर 2016 /AV News Bureau :

राज्यातील नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश म्हणजे जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयावर केलेले शिक्कामोर्तब आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले.

राज्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यावेळी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.

भ्रष्टाचार व काळ्या पैशावर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल म्हणजे समाजातील गरीब व मध्यमवर्गीय यांनी हा निर्णय स्वीकारला आहे. त्रास सहन करून जनतेने नोटबंदीला पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीच्या प्रचारात आपण प्रत्येक सभेत नोटबंदीचा विषय मांडला व जनतेने दरवेळी प्रचंड समर्थन केल्याचे अनुभवाला आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे व पक्षातील सर्व सहकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने व हिरीरीने काम केले. केंद्र सरकार व राज्य सरकारचे काम जनतेला सांगितले व पक्षाची भूमिका मांडली. राज्यात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाल्याबद्दल अभिनंदन, असेही ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले की, या निवडणुकीतील निकालामुळे नोटबंदीचा निर्णय योग्य असून जनता मोदीजींच्या या निर्णयाच्या पाठीशी आहे, हे स्पष्ट झाले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या ऊर्वरित तीन टप्प्यांमध्ये तसेच आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजपा याच प्रकारे पहिल्या क्रमांकावर राहील.

यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार, प्रदेश उपाध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर व प्रसाद लाड, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश कार्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., प्रदेश सचिव संजय उपाध्याय, आमदार भाई गिरकर, राज पुरोहित, योगेश सागर, मंदा म्हात्रे व कॅप्टन तमिळ सेल्वन, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये, मधू चव्हाण व गणेश हाके उपस्थित होते.