महिलाही चालवणार एसटी

चालक तथा वाहक पदासाठी 445 महिलांचे अर्ज  

2 जुलै रोजी होणार लेखी परीक्षा

मुंबई, 14 जून 2017/AV News Bureau:

एसटीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या एसटीच्या गाड्या चालविण्यासाठी आता पुरूषांच्याबरोबरीने महिलादेखील सज्ज झाल्या आहेत. कोकण विभागाकरीता होणाऱ्या भरतीप्रक्रियेत तब्बल 445 महिलांनीही अर्ज भरले आहेत. येत्या 2 जुलै रोजी चालक तथा वाहक (driver – cum- conductor) पदाकरीता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्य महामंडळाच्या अवजड गाड्या चालविण्यासाठी महिलांना सामावून घेण्याचा देशातील हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.

एसटीच्या गाड्या चालविण्यासाठी महामंडळातर्फे कोकण विभागाकरीता चालक तथा वाहक (driver – cum- conductor) पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तब्बल 7 हजार 929 चालक तथा वाहक (driver – cum- conductor) पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी 28 हजार 314 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. विशेष  म्हणजे या इच्छुकांमध्ये 445 अर्ज हे महिला उमेदवारांचे आहेत. या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या 2 जुलै रोजी होणार आहे. या परीक्षेस पात्र उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र, बैठक क्रमांक, व परीक्षा केंद्राबाबतचा तपशील ई-मेल द्वारे अथवा एस. एम.एस.द्वारे लवकरच कळविण्यात येणार आहे. आपला तात्पुरता संकेत क्रमांक (password) वापरून संबंधित उमेदवारांनी आपले प्रवेश पत्र प्राप्त करून घ्यावे, असे उमेदवारांना महामंडळातर्फे कळविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एसटीच्या गाड्या अतिशय वजनदार असतात. त्यामुळे एसटी महामंडळामध्ये चालक पदासाठी येणाऱ्या उमेदवारांना अतिशय  कठीण निकष पार करावे लागतात. एसटी चालविण्यासाठी अवजड वाहन चालविण्यासाठी लागणारा परवाना कमीत तसेच अवजड वाहन चालविण्याचा अनुभव प्रत्येकी 3 वर्षांचा लागतो. एसटी बसेस चालविण्यासाठी ताकदीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे आतापर्यंत केवळ पुरूषच भरती केले जात होते. मात्र आता महिलादेखील अवजड वाहने चालविण्याकडे वळत असल्याचे प्राप्त झालेल्या अर्जांवरून दिसून येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चूल आणि मूल यात न अडकता महिला ट्रेन, विमान चालवू लागल्या आहेत. आता अतिशय खडतर मानल्या जाणाऱ्या एसटीचे सारथ्य करण्यासही त्या आता सज्ज झाल्या आहेत. लेखी परिक्षेत पास झालेल्या उमेदवारांना 42 दिवसांचे खडतर प्रशिक्षण देण्यात यणार आहे. त्यानंतर सर्वांना सेवेत रुजू करून घेण्यात येईल,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एसटीच्या अनेक पुरूष चालकांना तंबाखू तसेच इतर व्यसन असते. मात्र महिलांना अशाप्रकारचे व्यसन नसते. त्यामुळे वाहन चालविताना अधिक सावधानतेने गाड्या चालवू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, शासनाची अवजड वाहने चालविण्याची जबाबदारी अद्यापपर्यत कोणत्याही राज्यांनी महिलांवर सोपवलेली नाही. त्यामुळे अशाप्रकारचा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचा दावा एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.