रिमोट तुमच्या हाती

अविरत वाटचाल न्युज ब्युरो (AV News) :

आजचं युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं असल्याचं  सर्रासपणे म्हटलं जातं. आधुनिक तंत्रानं आपल्या जीवनाचा कब्जा घेतला  असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. अशा अनेक घटनांपैकी एक असणाऱ्या टी. व्ही. या माध्यमाचं स्वरुप पाहता बदलाचा वेग लक्षात येईल.

मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या सर्वात बिझी स्टार असलेल्या टी.व्ही. ची आजकाल इडियट बॉक्स म्हणूनही हेटाळणी होवू लागली आहे. आज टी.व्ही.वर  विविध भाषांच्या वाहिन्यांचा सुकाळ झाला आहे. या  चॅनलवाल्यांनी घरातली शांती नाहिशी केली. माणसाला एका ठिकाणी बसवून पंगू बनवलंय. बीभस्ततेचा तर कडेलोट केलाय, अशी ओरडही सध्या सुरू आहे. मात्र कोणतीही गोष्ट एखाद्या मर्यादेपर्यंतच चांगली असते. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की, त्याची परिणिती बहुतेक वेळा वाईटात होते, असं जाणकार सांगत असतात. मनोरंजनाच्या विशेषतः टी.व्ही.च्या बाबतीतही काहीसं असंच होवू लागलं आहे.

भारतात दूरदर्शनने दूर चित्रवाहिन्यांची मुहूर्तमेढ रोवली. मनोरंजनाचं नवं दालन असलेल्या दूरदर्शनवर 1999 पर्यंत सायंकाळी 4 ते 7.30 इतकाच वेळ मराठी कार्यक्रमांना मिळायचा. त्यानंतर दिल्लीहून हिंदी कार्यक्रम सुरु व्हायचे. एकूणच दूरदर्शनमुळं टी.व्ही.ची क्रेझ वाढू लागली होती. अशावेळी मराठी भाषिकांसाठी जास्तीत जास्त मराठी कार्यक्रमांचा आनंद मिळावा यासाठी स्वतंत्र खासगी मराठी वाहिनीचा विचार सुरू झाला होता. याच गरजेतून मग 1999 च्या  सुमारास झी मराठी  वाहिनीचा उदय झाला.

आज 15-16 वर्षांनंतर महाराष्ट्रात 10 पेक्षा अधिक मराठी वाहिन्या उभ्या राहिल्या आहेत. गेल्या 15 वर्षांत मराठी वाहिन्यांची बाजारपेठेची क्षमता लोकांच्या लक्षात येवू लागली आहे. त्यामुळेच  अनेकांना मराठी वाहिन्यांच्या स्पर्धेत उतरावेसे वाटले. आपल्या मराठी प्रेक्षकांची जाण नक्कीच चांगली आहे. त्यांना चांगले पाहण्याची, ऐकण्याची आवड आहे. सुदैवाने मराठी साहित्य, महाराष्ट्राची एकूणच पार्श्वभूमी दर्जेदार असल्यामुळं चांगल्या कार्यक्रमाची निर्मिती आपोआप होऊ लागली आहे.

आज वाहिन्यांच्या कार्यशैलीत बदल झाल्याचं बोललं जातं. मात्र हे बदल होतच असतात आणि त्यामुळं या बदलाच्या प्रक्रियेत आपल्याला सहभागी व्हावेच लागते. हे बदल वरवरचे असतात. त्यामुळं बदल स्वीकारताना मूळ गाभ्याला धक्का लागू नये, याची काळजी मात्र घेणं आपल्या हाती आहे.

आजकाल टी.व्ही. मालिका हा वाहिन्यांचा जीव आहे. जेव्हा हिंदी वाहिन्या  ‘सांस बहु’ च्या फेऱ्यात अडकल्या होत्या, तेव्हा झी मराठीने अवंतिकासारखी मालिका सुरू कली. ज्या मालिकेत एका स्रीने नवऱ्याच्या अव्यवहाराविरोधात लढा दिला. मराठी प्रेक्षकांनी हा बदल स्वीकारला. म्हणूनच काळानुरुप बदललेली वेगवेगळी कथानकं प्रेक्षकांनी चोखंदळपणे स्वीकारली आहेत, हे आजवरच्या इतिहासावरून स्पष्ट होते. आज ‘सांस बहु’ ला बाजूला सारत प्रेक्षकांनी  ‘ बालिका वधू’ सारख्या सामाजिक विषयाला वाहिलेल्या मालिकांना उचलून धरलं आहे. हा बदल नक्कीच मनोरंजनाच्या नव्या दिशा अधोरेखीत करणारा आहे.

बदलत्या काळानुरुप प्रेक्षकांची भूकही वाढत आहे. त्यांना नाविन्याचा हव्यास आहे. नव्या आणि दर्जेदार गोष्टींच्या शोधात आजचा प्रेक्षकवर्ग दिसतो. मात्र त्याचा फायदा उठवत नको त्या गोष्टी प्रेक्षकांच्या माथी मारण्याचे प्रकारही सुरू असल्याची चर्चा केली जाते. आज अनेक वाहिन्यांच्या स्पर्धेमुळं या क्षेत्रात पैसा, ग्लॅमर्स आलं आहे. भव्य दिव्य सेट्स आलेत आणि मनोरंजनाचा साचाही बदलू लागला आहे. त्यामुळं वेगवेगळ्या कार्यक्रमांची निर्मिती होऊ लागली आहे. प्रारंभीच्या काळात झी मराठीनं मालिकांसह नक्षत्रांचे देणे, सारेगमपसारख्या संगितावर आधारित कार्यक्रमांची निर्मिती केली. पूर्वापार चालत आलेल्या गाण्यांच्या मूळ गाभ्याला हात न लावता ग्लॅमर्स आणि सुबक मांडणी केल्यामुळं प्रेक्षकांना हे कार्यक्रम आवडले.

आज आधुनिक तंत्रामुळं मनोरंजन केवळ एका बोटावर अवलंबून आहे. टी. व्ही. रिमोटच्या सहाय्यानं मनोरंजनाचा आनंद घेताना, भाषा, संस्कृतीच्या सीमारेषा आपसूक पुसून जावू लागल्या आहेत. माणूस खऱ्या अर्थानं ग्लोबल होवू लागला आहे. देशी परदेशी मनोरंजनाची दालनं आपल्याला खुली होवू लागली आहेत. या ग्लोबलायझेशनच्या चक्रात चांगले वाईट संस्कार आपल्यावर कळत नकळत होवू लागले आहेत. या सगळ्या धबडग्यात मनोरंजन दाखविणारा आणि ते स्वीकारणारा  सर्वसामान्य प्रेक्षक हे मुख्य घटक असले तरी प्रेक्षकच त्यात महत्वाची भूमिका घेवू शकतो, हेही तितकेच खरे आहे.

आज वाहिन्यांचा सुळसुळाट झाला आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय वाहिन्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहिन्या आपल्या दिमतीला आहेत. त्याचा फायदा प्रेक्षक वर्गालाच होणार आहे. त्यामुळं प्रेक्षकांनी आपल्या गरजा ओळखून कार्यक्रमांची निवड करण्याची गरज आहे. कारण जे चांगलं ते प्रेक्षक स्वीकारणार आणि ज्याला प्रेक्षक नाकारतील, हे आपोआप काळाच्या ओघात नाहीसे, होईल.

ज्याप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुलेंसारख्या महान समाज सुधारकांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं, त्याचप्रमाणं आजकालच्या प्रसारमाध्यमांनी केवळ टीकेची झोड न उठविता प्रेक्षकांना चांगलं काय  आहे, याची ओळख करून देणं गरजेचं आहे. जेणेकरून ज्या खरोखरीच वाईट गोष्टी आहेत, त्यांना प्रेक्षकच बाजूला सारतील.

आज टी.व्ही. माध्यम कमालीचे बदलत चालले आहे. आतापर्यंत वाहिन्या आपले कार्यक्रम दाखवित असत आणि प्रेक्षकांना ते निमूटपणे पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मात्र आता प्रेक्षकच सक्रिय झाला आहे. त्याच्या या सक्रियेला वाव मिळावा यासाठी त्यांचाही कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यात येत आहे. विविध परिसंवाद यामधून लोकांचा सहभाग वाढत आहे. त्यांच्या सूचनांना विचार केला जात आहे, हे वाहिन्या चालविणाऱ्यांना आता उमगले आहे. होम मिनिस्टरसारख्या कार्यक्रमाने तर चूल आणि मूल यातच अडकलेल्या महिलांना घराबाहेर पडण्याची संधी दिली. या कार्यक्रमाचे यश तर जगजाहीरच आहे. त्यामुळं आता लोकांच्या बदलत्या गरजांचा विचार करून वाहिनया कार्यक्रमांची निर्मिती करू लागल्या आहेत. मात्र तरिही प्रेक्षकांनी आपला निर्णय घ्यायचा आहे. एखादा कार्यक्रम वाईट आहे, अशी ओरड करायची गरज नाही. लोकांनी तो कार्यक्रम नाकारला की, त्या कार्यक्रमाचे भवितव्या वाहिनी चालविणाऱ्यांना समजते.

टी.व्ही.ला इंटरनेटचे आव्हान

सध्या भारतातील टी.व्ही. ज्या अवस्थेत आहे ती अवस्था प्राथमिक अवस्थेतून पुढे  चालू लागली आहे. भारतीय टी.व्ही.ला परिपूर्ण व्हायला आणखी काही वर्ष जावी लागतील. त्यामुळं आता जे काही टी.व्ही.वर पाहोय ती एक प्रयोगशील अवस्था आहे. त्यातून काही चांगलं निष्पन्न होत आहे तर काही चुकत आहे. मात्र येणाऱ्या काळात टी.व्ही.समोरील विशेषतः विविध वाहिन्यांसमोरील आव्हाने मोठी असणार आहेत. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी मार्ग काढतील यात वाद नाही. कारण टी.व्ही.ला आज प्रचंड स्पर्धेला सामोरं जाव लागणार आहे. त्यामध्ये सर्वात मोठा धोका इंटरनेटचा आहे. आज इंटरनेटवर सर्व प्रकारच्या मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांच्या दिमतीला ठेवलेला आहे. आजची तरुण पिढी ही टी.व्ही.पेक्षा इंटरनेटच्या जाळ्याकडे खेचली जात आहे. अशावेळी वाहिन्या चालविणाऱ्यांनाही स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी विविध पर्याय शोधावे लागतील, यात वाद नाही.

छोट्या पडद्यावरील विविध प्रयोग आणि प्रेक्षक

मुळात वर्तमानपत्रे तसंच चित्रपटांप्रमाणे वाहिन्यांना मर्यादा नसतात. वर्तमानपत्र तसंच चित्रपटांना काहीशा मर्यादा असतात. मात्र आधुनिक तंत्रामुळं वाहिन्या या जगभरात दिसत असतात. त्यामुळं टी.व्ही.चा प्रेक्षकवर्ग हा मर्यादीत नसतो. या प्रेक्षकांमध्ये सर्वच प्रकारचे प्रेक्षक असल्यामुळं त्या त्या घटकाला  त्यांच्या आवडीनुसार कार्यक्रम देण्याची कसरत वाहिन्यांना करावी लागते. काही वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या वाहिन्या होत्या. त्याची संख्या आता शेकडो झाली आहे. येणाऱ्या काळातही टी.व्ही.चा विस्तार कमालीचा वाढणार आहे. नवीन नवीन प्रयोगाची जोड मिळून टी.व्ही. अधिक सक्षम होईल. त्यामुळं टी.व्ही. वरील या वाहिन्यांच्या जाळ्यातून फिरताना प्रेक्षकांची नक्कीच तारांबळ उडणार आहे. मात्र अशावेळी प्रेक्षकांनीही अधिक सक्षम राहणे गरजेचे आहे. आपल्यासमोर दिसत आहे, ती आपली गरज आहे का, हे ओळखायला पाहीजे. त्यासाठी रिमोटचा वापर ते करतील आणि चांगलं ते निवडतील याबाबत दुमत नाही.

आज डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफी, अनिमल प्लॅनेट तसेच हिस्ट्रीसारख्या ज्ञान पुरविणाऱ्या माहितीपूर्ण वाहिन्या आपल्याला पहायला मिळतात. त्यावरील अतिशय चांगल्या डॉक्युमेंटरीज मुलांना तसेच घरातील मोठ्या मंडळींना पाहण्यास प्रवृत्त करण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या वाहिन्या आता मराठीतही येण्याची गरज आहे. पुढील दशकभरात ते शक्य होईल.  मराठी प्रेक्षकांची रुची पाहता आगामी काळात डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफ्री आणि इतर माहिती पुरविणाऱ्या वाहिन्या मराठीतही सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं वाहिन्यांच्या जाळ्यातून मार्ग काढताना प्रेक्षकांनी वाईट बाजूला सारून चांगले निवडल्यास त्यांचे चांगले मनोरंजन होईल, यात शंका नाही. कारण शेवटी रिमोट तुमच्या हाती आहे.