कवी, निवेदक महेंद्र कोंडे यांचा ‘अभिनय कट्टा गौरव’ पुरस्काराने सन्मान

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 19 जून 2023

नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच कवी महेंद्र कोंडे यांना ‘अभिनय कट्टा गौरव’ पुरस्काराने मानपत्र प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.अभिनय कट्ट्याचे  किरण नाकती यांच्या हस्ते  महेंद्र कोंडे यांना मानपत्र प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.

यावेळी  रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत आषाढस्य प्रथम दिवसे अर्थात महाकवी कालिदास दिनाच्या पूर्वसंध्येला अभिनय कट्ट्यावर आयोजित महेंद्र कोंडे यांच्या ‘कविता बावनकशी’ कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली. ‘मी कविता करतो तुमचा गैरसमज, मी माझ्या हृदयाची स्पंदने टिपतो फक्त’ अशी सुरूवात केल्यानंतर त्यांच्या कविता सादरीकरणाच्या अनोख्या शैलीने रसिक मंत्रमुग्ध झाले. बाहेर पाऊस नसला तरी तब्बल 2 तास महेंद्र कोंडे यांच्या कवितांच्या पावसात श्रोते चिंब भिजत होते.

‘फादर्स डे’ चे औचित्य साधून साकारलेल्या ‘बाप’ या कवितेच्या अखेरीस रसिक हेलावले. ‘आई’ कवितेने प्रत्येकाला आपल्या आईची आठवण करून दिली. ‘माझी मुलगी, बूट, घर, मित्रा’ अशा विविध कवितांनी बदलत्या वास्तवात सैलावत चाललेले नात्यांचे बंध घट्ट करण्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला. ‘सहोदर’ या प्रतिकरूपातील कवितेने देशाची व्यथा मांडली. ‘आठवणींची गम्मत न्यारी’ ऐकताना अनेकजण नॉस्टॅल्जिक झाले.

एकापाठोपाठ एक सरस कवितांनी बहरत गेलेल्या या मैफलीच्या अखेरीस ‘कवी म्हणूनच जगणार, कवी म्हणूनच मरणार, कवितेच्या सरणावर, कवी म्हणूनच जळणार’ अशा शब्दात महेंद्र कोंडे यांनी मांडलेले कवितेशी असलेले घट्ट नाते रसिकांना भावले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी पदावर असूनही अत्यंत विनम्र असणारा हा मातीशी घट्ट नाते सांगणारा आपला माणूस त्याच्या कवितेइतकाच निर्मळ आहे असे सांगत किरण नाकती यांनी आजवर कवितेसह इतर लेखनप्रकारात तसेच निवेदन, सूत्रसंचालन व प्रशासकीय कामकाजात महेंद्र कोंडे यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्या संपूर्ण कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी सुबोध भावे, रूपेश बने या रंगकर्मींनंतर आज तिसरा अभिनय कट्टा गौरव पुरस्कार महेंद्र कोंडे यांना प्रदान करण्यात येत असल्याचे सांगितले.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र