स्पर्धा परीक्षांचे स्वरुप समजून घेणे महत्वाचे- मुंडे

नवी मुंबई,9 डिसेंबर 2016 / AV News Bureau :

स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आपल्यासमोर ‘सर्वोत्तम गुण’ मिळविणे हेच एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे हे सांगत, त्याकरीता स्पर्धा परीक्षांचे स्वरुप समजून घेणे महत्वाचे आहे हे स्पष्ट करीत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त  तुकाराम मुंढे यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जावे याविषयी मार्गदर्शन केले.

नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये त्यांनी उपस्थित तरूणाईशी थेट संवाद साधत स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले.

स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जावे हेच एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे’ असे सांगत त्यांनी ‘सध्या अभ्यास कसा करता व कसा केला पाहिजे’ या दोन्हींविषयी संवाद साधत स्पर्धा परीक्षेसाठी करावयाच्या योग्य अभ्यास पध्दतीची माहिती दिली.

सर्वोत्तम गुण मिळविण्यासाठीच स्पर्धा परीक्षा देणे हा एकमेव उद्देश आपण नजरेसमोर ठेवायला पाहिजे, कारण स्पर्धा परीक्षा या पदास पात्र योग्य उमेदवार निवडण्यासाठी घेतल्या जातात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. याकरीता परीक्षेतील प्रश्नांचे स्वरुप समजून घेणे महत्वाचे असून  उत्तर लिहिण्याच्या पध्दतीची व स्वरुपाचीही विविध उदाहरणे देत व उपस्थितांकडून त्यांची मते जाणून घेत उत्तरांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

स्पर्धा परीक्षा ही ऑलराऊंडर निवडण्याची  प्रक्रिया आहे हे लक्षात घेऊनच अभ्यास करायला हवा. उत्तरातून आपली निर्णय क्षमता दिसून येते. परीक्षेत प्रश्न किती मार्कांचा आहे व त्याचे उत्तर आपण कसे देतो यावर आपली स्पर्धा परीक्षेतली गुणवत्ता ठरते . त्यामुळे परीक्षेकडे प्रक्रिया म्हणून बघा, तसेच प्रश्नपत्रिका वाचू नका तर ती समजून घ्या असा कानमंत्र त्यांनी दिला.

  • उत्तराचे आठ विभाग

उत्तराचे स्वरुप समजावून सांगताना उत्तराचा गाभा असणारी प्रस्तावना, मुद्देनिहाय माहिती, भिन्न दृष्टीकोन (Different theories), फायदे – तोटे (advantage and disadvantage), दृष्टीकोनाशी संलग्नता (Linkages with theory), अभिप्राय (Opinion)- यामध्ये व्यक्तीगत अभिप्राय अपेक्षित नसून सर्वसमावेशक अभिप्राय, वर्तमान स्थितीशी संलग्नता आणि निष्कर्ष असे सुयोग्य आणि संपूर्ण उत्तराचे 8 विभाग त्यांनी विविध उदाहरणे देत समजवून सांगितले.

प्रश्नाचे स्वरुप समजावून घेऊन प्रश्न – उत्तरांचे लिंक करणे महत्वाचे असल्याचे स्पष्ट करीत मागील 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील विषयानुरुप प्रश्नाचे स्वरुप समजून घेऊन अभ्यास करावा . संपूर्ण आणि अचूक उत्तर हेच यशाचे मर्म असल्याचे स्पष्ट करीत स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना केवळ माहिती असणे उपयोगाचे नाही तर असलेल्या माहितीचा वापर कसा आणि कुठे करता याला महत्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणा-या विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सुलभ व्हावे याकरीता महानगरपालिकेने आपल्या ग्रंथालयांत अभ्यासिका सुरू केल्या आहेत. सकाळी 6 ते रात्री 1 अशी अभ्यास करण्यासाठी सर्वांना सोयीची ठरेल अशी वेळ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याठिकाणी स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक पुस्तकेही उपलब्ध करून ठेवण्यात आलेली आहेत. या सुविधेचा जास्तीत जास्त तरूणांनी उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले.

  • स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनासाठी गाइडन्स लिंक सुरू करणार

स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणा-या विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटीबध्द असून हा मार्गदर्शन शिबिराचा उपक्रमही त्याचाच एक भाग असल्याचे सांगत लवकरच महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक माहिती व उपयोगी साहित्य असणारी  “गाई़डन्स” ही लिंक उपलब्ध करून देण्यात येईल असे जाहीर केले.