नवी मुंबई महापालिकेची “nmmc e-connect” सेवा

इंटरनेट बँकींगमोबाईल ॲप व पीओएस प्रणालीव्दारे कॅशलेस कर भरणा सुविधा

ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली ही नागरिकांच्या सेवेसाठी

नवी मुंबई / AV News Bureau:

  नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित सुविधा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने ई-गव्हर्नंसचा प्रभावी वापर करण्यावर महापालिका प्रशासनाने अधिक भर दिला आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) ww.nmmc.gov.in या शासकीय लिंकला जोडत अधिक अद्ययावत केले आहे.

  • “nmmc e-connect” हे विशेष मोबाईल ॲप

“nmmc e-connect” हे विशेष मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून या ॲपव्दारे मालमत्ताकर, पाणीपट्टी भरणा करण्यासोबतच ‘ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली’ (public grievance system) ॲपवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध असणा-या सुविधा नागरिकांच्या हातातल्या मोबाईलच्या एका टचवर उपलब्ध होत आहेत.

यापुर्वीच्या “nmmc citizen” या मोबाईल ॲपवर मालमत्ताकर व पाणीपट्टी भरणा करता येऊ शकत होता.  या कर भऱणा प्रक्रीयेत अधिक सुविधा देत क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, इंटरनेट बँकींग अशा सुविधा ॲपव्दारे उपलब्ध करून दिल्या आहेत. इंटरनेट बँकींग सुविधेमध्ये 40 नामांकीत बँकांचा समावेश असून कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने टाकलेले हे यशस्वी पाऊल आहे.

  • कॅशलेस व्यवहारासाठी पालिका मुख्यालयात पी.ओ.एस. मशीन

कॅशलेस व्यवहारासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि प्रत्येक विभाग कार्यालयात पी.ओ.एस. मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या असून यामुळे नागरिकांना कर भरणा करण्यासाठी स्वत: सोबत रोख रक्कम नेण्याची गरज नाही. नागरिक आपल्या बँकेच्या डेबीट कार्डव्दारे कर भरणा करु शकणार आहेत.

  • तक्रारींसाठी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली

नागरिक “nmmc e-connect” या मोबाईल ॲपव्दारेही असतील त्या ठिकाणाहून कॅशलेस कर भरणा करू शकतात. ॲन्ड्रॉईड आणि ॲपल या दोन्ही मोबाईल सिस्टीमवर हे ॲप डाऊनलोड करण्याची सुविधा असून या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे या ॲपमध्ये ‘ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली’ (public grievance system)सुविधा उपलब्ध आहे. ज्यामुळे नागरिक अगदी चालता – चालता सुध्दा दोन ते तीन मिनीटात आपली तक्रार महानगरपालिकेकडे दाखल करू शकतात. विशेष म्हणजे या ॲपमध्ये तक्रार कशी दाखल करायची याच्या माहितीसाठी Tutorial दिलेले आहे.

‘ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली’ (public grievance system) वापरण्याकरीता नागरिकांना ॲपमध्ये जाऊन स्वत: चा प्रोफाईल तयार करावा लागेल. ज्यामध्ये नागरिकाचा मोबाईल क्रमांक व इ-मेल आयडी एकदाच घेण्यात येईल. ज्यावर तक्रारीविषयी अद्ययावत माहिती वेळोवेळी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. नागरिक यावर छायाचित्रासह तक्रार दाखल करू शकतात व त्याची पध्दतही अत्यंत सोपी व जलद आहे. मोबाईलमध्ये मराठी किपॅड असेल तर मराठी भाषेतही नागरिक तक्रार दाखल करू शकतात.

तक्रार दाखल केल्यानंतर नागरिकांना एस.एम.एस. व इ-मेलव्दारे तक्रार क्रमांक पाठविण्यात येतो. ज्या तक्रार क्रमांकाव्दारे नागरिक त्याच्या तक्रारीविषयीची सद्यस्थिती वेळोवेळी जाणून घेऊ शकतात. या ॲपमधील My Grievance टॅब मध्ये तक्रारींची अपडेट माहिती उपलब्ध राहील. तसेच नागरिक Track टॅबमध्ये तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतात.

तक्रार दाखल करताना नागरिकास महानगरपालिकेच्या कोणत्या विभागाशी संबंधित तक्रार आहे हे ठाऊक नसले तरी या प्रणालीत विकसित खास यंत्रणेव्दारे ती तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येते. या प्रणालीवर दाखल झालेल्या तक्रारी बघून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक अधिकारी यांस विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त तक्रारीवर त्या कालावधीत संबंधित अधिका-याकडून कार्यवाही करण्यात अथवा उत्तर देण्यात आले नाही तर प्रणालीव्दारे ती तक्रार त्यांच्या वरिष्ठ अधिका-याकडे पुढे पाठविली जाते. तेथूनही त्याची दखल घेतली गेली नाही तर महापालिका आयुक्तांकडे ती तक्रार प्रणालीव्दारे पुढे जाते. विशेष म्हणजे नागरिक आपण दाखल केलेल्या तक्रारींवरील कार्यवाहीला गुणांकन करून श्रेणी देऊ शकतात. शिवाय समाधान झाले नाही तर पुन्हा तक्रार दाखल करण्याचा पर्यायही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

  • परिवहनउपक्रमातही कॅशलेस सुविधा

ई-गव्हर्नन्सवर भर देत महानगरपालिकेच्या एन.एम.एम.टी. परिवहन उपक्रमाचे मासिक / तिमाही / सहामाही / वार्षिक पासेस काढण्यासाठी पी.ओ.एस. मशीन्स(पॉईंट ऑफ सेल) एन.एम.एम.टी. च्या प्रत्येक डेपोत उपलब्ध करून दिल्या असून या सुविधेव्दारे नागरिक क्रेडिट / डेबिट कार्ड वापरून पासेस काढू शकतात. याशिवाय सध्या 80 वातानुकुलित (ए.सी.) बसेसमध्ये पी.ओ.एस. मशीन देण्यात आल्या असून यामुळे नागरिकांना सुट्या पैश्यांची अडचण जाणवणार नाही.