‘सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्यांवर सरकारकडूनच गदा’

पनवेल, 9 डिसेंबर 2016 / AV News Bureau:

सेबी कंपनीत काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्त सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून त्यांच्याजागी महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या कर्मचाऱ्यांची भरती करून स्थानिकांच्या नोकऱ्यांवर राज्य सरकारच गदा आणत असल्याचा आरोप कामगार नेते महेंद्र घरत यांनी केला आहे.

कामावरून कमी करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांनी सेबी कंपनीसमोरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यावेळी महेंद्र घरत यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

रायगड बोर्डाच्या माध्यमातून येथील सेबी कंपनीत स्थानिक प्रकल्पग्रस्त गेल्या चार वर्षांपासून सुरक्षा रक्षकांचे काम करीत आहेत. मात्र या कामगारांना कामावरून कमी करून त्यांच्या जागी महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आली आहे. यामुळे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. एकप्रकारे राज्य सरकारच स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा आणत आहे. मात्र जोपर्यंत स्थानिकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे घरत यांनी सांगितले.

यावेळी कामगार नेते श्याम म्हात्रे, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष नारायणशेठ ठाकूर, भीमसेन माळी, हेमराज म्हात्रे, महादेव कटेकर, खालापूर तालुका कॉंग्रेस अध्यक्ष कृष्णाशेठ पारिंगे, राजन चौधरी, डॉ. राजेश घरत आदी मान्यवर उपस्थित होते.