जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांसाठी 12.5 टक्के अंतर्गत भूखंड वाटप

भूखंड वाटपाची पहिली सोडत पार पडली

 नवी मुंबई, 27 डिसेंबर 2016 / AV News Burreau :

 जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) प्रकल्पग्रस्तांसाठी 12.5 टक्के भूखंड वाटप योजनेअंतर्गत संगणकीय सोडत काढून भूखंडांचे वाटप करण्यात आले. बेलापूर येथील सिडको भवनमध्ये 27 डिसेंबर रोजी ही भूखंड वाटपची सोडत पार पडली.

गावनिहाय संपादित झालेल्या भूधारकांनी वा त्यांच्या कायदेशीर वारसांनी, त्यांची संपादित जमिनीशी संबंधित निवाडानिहाय पात्रता एकत्रिकरणाद्वारे भूखंड वाटपाकरिता संमती दिलेली आहे, अशा भूधारकांचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात आला होता. सदर भूधारकांना नव्यानं विकसित करण्यात आलेल्या जेएनपीटी नोडमध्ये भूखंड देण्यात आले आहेत. एकूण 25 भूखंडांसाठी काढण्यात आलेल्या या सोडतीमध्ये कमीत कमी 2000 चौ.मी. क्षेत्रफळाचा तर जास्तीत जास्त 10,741 चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड प्रकल्पग्रस्तांसाठी देण्यात आला आहे.

jnpt-12-5

सोडतीची यादी मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (रायगड), सिडको भवन, भूमी व भूमापन (साटयो), सातवा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई व व्यवस्थापक (कार्मिक व औद्योगिक संबंध), जेएनपीटी, प्रशासन भवन, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट शेवा, नवी मुंबई या कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणं सिडको महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://cidco.maharashtra.gov.in/ देखील सदर यादी उपलब्ध आहे.

भूखंड वाटप कार्यक्रमाला मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, व्यवस्थापक कार्मिक आणि औद्योगिक संबंध जेएनपीटी मनिषा जाधव व उपव्यवस्थापक (बंदर नियोजन) राजेश म्हात्रे आदी उपस्थित होते.