रायगडमधील कुंडलिका खाडीवरील पुलाला भेग

तीन तालुक्यांना जोडणारा पस्तीस वर्ष जुना पूल

बोर्ली-मांडला, 19 जून 2017/AV News Bureau:

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यांना जवळ आणणाऱ्या कुंडलिका खाडीवरील साळाव रेवदंडा पुलाला मोठी भेग पडल्याचे आढळून आले आहे. हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर खळबळ उडाली असून महाडच्या सावित्री पुलाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुरुडच्या तहसिलदारांनी आज पुलाची पाहणी केली असून या पुलावरून होणारी अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

साळाव रेवदंडा पुलाला जवळपास पस्तीस वर्षे होऊन गेली आहेत. या पुलाचे काम माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या काळात झाले आहे. साळाव -रेवदंडा खाडी पुलाची लांबी ५१० मीटर एवढी आहॆ. या पुलाला बारा गाळे आहेत. हा पूल रोहा, मुरुड, आणि अलिबाग या तीन तालुक्यांना जोडतो. सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांनी या पुलाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे पुलाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यापूर्वी सुद्धा दोन वेळा पुलाला भेग पडली होती.  त्यावेळी भेगेवर लोखंडी पत्रा ठेवून त्यावर डांबर टाकून तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली होती. आता पूलावर त्याच ठिकाणी जवळपास फूटभर भेग पडली आहे. या भेगेतून पुलाखालून वाहणारे पाणी स्पष्टपणे दिसत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या कठड्यांची दुरवस्था होऊन काही कठड्यांचा भाग समुद्रात कोसळला आहे. पुलावर खड्ड्याचे प्रमाण वाढत चालल्याचे अखिल भारतीय  कांठा प्रांतीय जैन साजणा ओसवाल संघाचे माजी सदस्य केवलचंद जैन सांगितले.

या पुलांची वेळेत डागडूजी केली नाही, तर या पट्टयातील बहुतांश गावांचा अलिबागशी असणारा संपर्क तुटणार आहे. त्याचप्रमाणे येथील पर्यटन व्यवसायालाही फटका बसण्याची भिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अश्रफ घट्टे यांनी व्यक्त केली आहे.

खाडीवरील पुलाला भेग गेल्याची माहिती मिळाल्यानंतर मुरुडचे तहसीलदार उमेश पाटील यांनी आज या पुलाची पाहणी केली.

या  भेगेबाबत बांधकाम विभाग तसेच संबंधितांशी पत्रव्यवहार करून ताबडतोब खुलासा मागवणार आहे.  या पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत सूचना करण्यात आल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली.

pool visit a

यावेळी बोर्ली मंडळ अधिकारी सविता वेंगुलेकर, तलाठी किरण जुईकर, महारष्ट्र सागरी मंडळाचे रेवदंडा बंदर अधिकारी अमर पालवणकर, रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सस्ते, बांधमकाम विभाग मुरुडच्या कनिष्ठ अभियंता खिल्लारे, समाजवादी पार्टीच्या अलिबाग विधानसभेच्या महिला अध्यक्षा सारिका माळी -शिंदे आणि अन्य उपस्थित होते.