रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी प्लास्टिकचा वापर

नवी मुंबई महानगरपालिकेचा नवा प्रयोग

नवी मुंबई, 29 डिसेंबर 2015 /AV News Bureau :

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये कच-यातील प्लास्टिक पासून तयार केलेले दाणे (ग्रॅन्युल्स) आता डांबरी रस्ता तयार करताना वापरण्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागानं सुरुवात केली आहे.

 संपूर्ण जगभरात प्लास्टिकच्या कच-याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. अशावेळी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्यं घनकच-यापासून खत निर्मिती व फ्युएल पॅलेट्स तयार केलं जात आहे. कच-यातील प्लास्टिक पासून त्याचे दाणे (ग्रॅन्युल्स) तयार केले जातात.  हे प्लास्टिकपासून तयार केलेले दाणे आता डांबरी रस्ता तयार करताना वापरण्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागानं सुरुवात  केली आहे.सध्या महानगरपालिकेने रस्ते निर्मितीत प्लास्टिक दाण्यांचा वापर करणारी 100 मीटर लांबीची 10 रस्त्यांची कामे हाती घेतली  आहेत. हे प्लास्टिकचे दाणे डांबरी रस्ता तयार करताना खडी व डांबरासोबत उच्च तापमानात वितळविण्यात येत असून अशाप्रकारे तयार केलेल्या अस्फाल्ट काँक्रीटचा थर वेअरींग कोट म्हणून रस्त्यावर वापरण्यात महानगरपालिकेनंसुरुवात केली आहे.

  • प्लास्टिकच्या वापराचे फायदे

मागील चार दिवसात एम.आय.डी.सी. क्षेत्रात खराब झालेल्या रस्त्यांवर प्लास्टिकयुक्त डांबरी रस्त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. अशा प्लास्टिकयुक्त डांबरीकरणामुळं

रस्त्यांची लवचिकता वाढल्यानं रस्त्याला  भेगा पडत नाहीत. तसंच वरील थरामध्ये प्लास्टिकचा वापर केल्यानं  रस्त्यावर पडणारे पाणी रस्त्यात झिरपत नाही व पर्यायानं रस्त्यांचं आयुष्य वाढतं. आजच्या जगात प्लास्टिकची विल्हेवाट हा यक्ष प्रश्न झालेला असल्यानं रस्ते निर्मितीत पर्यावरण रक्षण होण्यास मदतीचं ठरणार आहे.

  • खर्चात बचत होणार

प्लास्टिकचा वापर सुरू केल्यानं रस्त्याचं आयुष्यमान वाढलं आहे. त्याचा परिणाम  रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्ती खर्चात बचत होऊन हा निधी इतर महत्वाच्या नागरी कामांमध्ये खर्च केला जाऊ शकतो. अशाप्रकारे रस्ते निर्मितीत प्लास्टिकच्या वापराच्या प्रयोगाचा वर्षभर विभिन्न हवामानात अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर पुढील काळात सर्व डांबरी रस्त्यांमध्ये प्लास्टिकचा वापर करण्यावर भर दिला जाईल.

प्लास्टिक समस्येवर नवी मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभागानं उपयोगात आणलेला हा रस्ते निर्मितीत प्लास्टिकच्या वापराचा अभिनव प्रयोग नवी मुंबई महानगरपालिकेची पर्यावरणशील अशी ओळख अधिक व्यापक करणारा आहे.