न्हावा शेवा प्रकल्पग्रस्त आक्रमक

सिडकोच्या अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटविण्यास विरोध

पनवेल, 30 डिसेंबर 2016/AV News Bureau :

महामार्गालगत असलेलं अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी जोरदार विरोध केला. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलनाची भूमिका कायमच राहील, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी  दिला.

स्थानिक भूमीपुत्रांनी न्हावा-शिवडी मार्गासह अनेक प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी दिल्या. मात्र अद्याप भूमीपुत्रांना न्याय मिळालेला नाही. भू संपादन प्रक्रियेदरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या एमएमआरडीए प्रशासन आणि सिडको व्यवस्थापन यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये नवी मुंबई विमानतळ बाधित शेतकऱ्यांप्रमाणेच सागरी सेतू बाधित प्रकल्पग्रस्तांना साडेबावीस टक्के भूखंड परताव्याचे पॅकेज देण्याचं मान्य करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणं स्थानिक मच्छिमारांनाही पुनर्वसन पॅकेज देण्याचं मान्य करण्यात आलं होतं. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

सेतू प्रकल्पाचे काम सुरू होण्यास अजून बराच कालावधी आहे. असे असताना सिडको प्रशासन महामार्गालगतची बांधकामे पाडून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचं सांगत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला कारवाई करण्यापासून रोखलं. तसंच दि.बा. पाटील अमर रहे, प्रकल्पग्रस्तांच्या एखजुटीची विजय असो, अशा घोषणाही प्रकल्पग्रस्तांनी दिल्या.

यावेळी महेंद्र घरत, सुरेश पाटील, अतुल पाटील, बाळाशेट पाटील, संदेश ठाकूर, नरेश घरत, मेघनाथ म्हात्रे, सुनिल घरत, जासई सरपंच धीरज घरत, जासई माजी सरपंच संतेष घरत, केशरीनाथ घरत माणिक म्हात्रे, मुरलीधर ठाकूर, पी.जी.ठाकूर, उद्योगपती संजय ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.